वर्धा (जनता आवाज वृत्तसेवा) : – शेतकरी ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन विविध प्रकारचे नवनवीन धोरणे राबवत आहे. गेल्या काळात अनेक निर्णयांमधून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय खोडके, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी वान्मथी सी, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुबोध मोहिते, माजी राज्यमंत्री रणजित कांबळे, माजी आमदार राजु तिमांडे, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲङ सुधीर कोठारी आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी प्रकल्पातून कॅनलद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. कॅनलद्वारे पाण्याचा अपव्यय होत असल्याने यापूढे पाईपलाईनद्वारे शेतीला सिंचन सुविधा निर्माण करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार असून यामुळे सिंचन सुविधेत वाढ होण्यासोबतच प्रकल्पातून बारमाही पाणी उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर केल्यास शेती उत्पन्नात अधिक वाढ होऊन शेतकरी आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, असे अजित पवार पुढे बोलतांना म्हणाले.
येथील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करण्यासाठी देशात नावाजलेल्या बारामती येथील कृषि विज्ञान संशोधन केंद्रामध्ये प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देऊ, असे अजित पवार म्हणाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे सर्वे करण्यात आले असून लवकरच निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी निधी कमी पडू देणार नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर राज्य शासन काम करीत असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम शासन करीत आहे. हिंगणघाट हे वर्धा जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून प्रसिध्द आहे. येथे कायदा सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिस स्टेशन व्हावे अशी मागणी असल्याने लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी दिले.
सर्वप्रथम त्यांनी हिंगणघाट बाजार समिती राज्यात विश्व बॅकेच्या निकषाप्रमाणे प्रथम आल्याबद्दल तसेच बाजार समितीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध शेतकरी हिताच्या योजनांचे कौतुक केले. जागतिक बँक व पणन विभागाच्या निकषानुसार हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समिती गेल्या पाच वर्षात अव्वल स्थानी राहिली आहे. या बाजार समितीच्यावतीने शेतकरी व त्यांच्या कुटूंबियासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आपल्या मनोगतातून समीर कुणावार यांनी बाजार समितीची प्रशंसा केली. बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी शित गोदाम उभारण्यात येणार असून यासाठी शासनाच्यावतीने 25 कोटी रुपये गोदाम बांधकामासाठी तसेच जागेसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आ.समिर कुणावार यांनी केली.
हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमास शिकत असलेल्या मुलांसाठी लॅपटॉप, शेतक-यांच्या एका बैलाचा मृत्यु झाल्यास 10 हजार रुपये तर दोन बैलाचा मृत्यु झाल्यास 15 हजार रुपये, बाजार समितीमध्ये शेतक-यांना एका रुपयामध्ये भोजन मोफत चहा तसेच एका रुपयामध्ये राहण्याची सुविधा निर्माण करुन देण्यासोबतच विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सुधीर कोठारी म्हणाले.
यावेळी माजी राज्यमंत्री रणजित कांबळे, राजू तिमांडे यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या मुलांना लॅपटॉप, अंगणवाडीसाठी सिलींग फॅन, बैल मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांना धनादेश, आगग्रस्त कुंटूंबियांना धनादेश, शाळेला डिजिटल पॅनलचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला हरीश वडतकर, हुकुमचंद अमघरे, प्रविण देशमुख, मधुसुदन हरणे, मनोज वसू, आकाश पोहाणे, बाळासाहेब तोळसकर, अमित गावंडे, योगिता तुळणकर, श्री. चतुर, शरद सहारे, आशिष कापसे, जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी, महिला व नागरिक उपस्थित होते.