अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे फिजिओथेरपी महाविद्यालय, अहिल्यानगर येथे जागतिक भौतिकोपचार दिन २०२१ निमित्ताने भौतिकोपचार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. हा सप्ताह २८ ऑगस्ट २०२५ पासून ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत असणार आहे. या वर्षीच्या भौतिकोपचार दिनाचा विशेष विषय “सुदृढ वृद्धत्व” असा असून या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून विविध शैक्षणिक व कलात्मक उपक्रम राबवले जाणार आहेत.
या निमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने बहुविद्याशाखीय मोफत भौतिकोपचार शिबिर तसेच जागरुकता रॅलीचे आयोजन महानगरपालिका प्रांगणात करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये भौतिकोपचाराचे महत्त्व, आरोग्य संवर्धन, सुदृढ वृद्धत्व आणि अपंगत्व प्रतिबंध याबाबत जनजागृती करणे हा आहे.
विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग, भौतिकोपचारतज्ज, आरोग्य तज्ज आणि स्थानिक नागरिक या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेणार असून शिबिरात मोफत सल्लामसलत व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. विशेषतः वृद्ध व्यक्तींना आरोग्य जपण्यासाठी भौतिकोपचाराच्या माध्यमातून उपयुक्त माहिती दिली जाणार आहेत.
आयोजकांनी सांगितले की, “सुदृढ वृद्धत्व” या संकल्पनेद्वारे प्रत्येकाने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आरोग्यपूर्ण व सक्रिय राहावे, यासाठी भौतिकोपचार महत्त्वाची भूमिका बजावते.
नागरिकांनी येत्या ८ सप्टेंबर रोजी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा आणि रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन डायरेक्टर डॉ. अभिजित दिवटे आणि प्राचार्य डॉ. श्याम गणवीर यांनी केले आहे.