संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला आहे. मात्र काही भागांमध्ये कमी पाऊस आहे. सर्व भागांमध्ये चांगला पाऊस होऊन राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना करताना मराठा समाजाच्या मागणीसाठी सुरू झालेले मनोज जरांगे यांचे आंदोलन यशस्वी होऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळू दे अशी प्रार्थना काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी गणेश चरणी केली आहे.
सुदर्शन निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना मा महसूल व कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाली. यावेळी सौ कांचनताई थोरात, कन्या कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. हसमुख जैन आदी उपस्थित होते. विधिवत पूजा करून श्री गणेशाची स्थापना यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात म्हणाले की, यावर्षी धरणांच्या भागात चांगला पाऊस झाल्याने धरणी भरले आहेत. काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे सर्व भागांमध्ये चांगला पाऊस होऊन राज्यातील शेतकरी सुखी समाधानी व आनंदी होऊ दे. ही प्रार्थना त्यांनी केली.
याचबरोबर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले आंदोलन संघटितपणे पुढे जात आहे. हे आंदोलन यशस्वी होऊन मराठा समाजातील गरीब घटकांच्या जीवनात आनंद व समृद्धी निर्माण व्हावी अशी प्रार्थना ही त्यांनी केली.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आरक्षणाचा विषय हा न्यायालयाचा येतो. त्यामुळे त्यावर बोलण्याच्या मर्यादा आहेत. परंतु हे आंदोलन म्हणजे लोकचळवळ आहे. समाज संघटित येतो आहे तेव्हा सरकारने त्यांच्या मागण्यांना मान देऊन तातडीने आरक्षण लागू केले पाहिजे. ओबीसी, आदिवासी, व मागासवर्गीय यांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे जेणेकरून मराठा समाजातील गरीब घटकाला त्याचा लाभ होईल.
सध्या देशात व राज्यात भाजपा प्रणित सरकार आहे .त्याचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे. केंद्र सरकार हे बहुमताच्या जोरावर लोकशाहीला न पचणारे अनेक निर्णय घेत आहे. मराठा समाजाच्या जनभावनेचा आदर करून आरक्षणाची टक्केवारी वाढवून घेतली पाहिजे. याकरता केंद्राने पुढाकार घ्यावा अशी मागणी करताना महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे.
आता मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर या सरकारने नवी समिती स्थापन केली आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची प्रमुख मागणी असून मराठा समाजाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबाच आहे. या आंदोलनाला सर्वांनी मिळून पाठिंबा दिला पाहिजे असे ते म्हणाले
तर डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मोठा आनंदाचा सण आहे. संपूर्ण राज्यसह देशात मोठ्या उत्साहात हा सण साजरा होत असून संगमनेर शहर व तालुक्यात सर्वजण एकत्र येऊन आनंदाने सहभागी झाले आहेत. आज प्रत्येक घरात गणेशाचे आगमन झाले असून संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक सुखी समाधानी होऊ दे याचबरोबर नागरिकांच्या जीवनातील विघ्न विघ्नहर्ता गणेशाने दूर करावे अशी प्रार्थना ही त्यांनी केली.
यावेळी सुदर्शन निवासस्थान, याचबरोबर अमृत उद्योग समूहातील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात, राजहंस दूध संघ, इंजीनियरिंग कॉलेज शेतकी संघ, अमृतवाहिनी बँक, यशोधन कार्यालय, येथेही गणेशाची स्थापना मोठ्या आनंदाने करण्यात आली..