लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलला सन 2024 – 25 चा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. राम शिंदे व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते दि 5 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ बी बी अंबाडे यांनी दिली.
प्रवरा पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करून शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती केल्याबद्दल उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या विभागातून जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या पुरस्कार सोहळ्यात प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ बी बी अंबाडे व उपप्राचार्य श्री के टी अडसूळ यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या समवेत शिक्षक प्रतिनिधी म्हणून पर्यवेक्षिका सौ एम एस जगधने, सौ शुभांगी रत्नपारखी, श्री जी एफ मनियार हे उपस्थित होते.
या पारितोषिक वितरण सोहळ्यास आ. विठ्ठलराव लंघे पाटील, आ. काशिनाथ दाते, राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे,बाभळेश्वर केंद्राचे केंद्रप्रमुख कानिफनाथ कोळेकर इत्यादी उपस्थित होते.
प्रवरा पब्लिक स्कूलने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या सीईओ डॉ. सुष्मिता विखे पाटील, अतिरिक्त सीईओ डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे या सर्वांनी अभिनंदन केले.