अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):- “स्वच्छता ही सेवा प्रत्येकाची जबाबदारी, अहिल्यानगरची प्रगती!” असा संदेश देत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता पंधरवडा अभियानाला रविवारी सुरुवात करण्यात आली. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता पंधरवडा अभियानाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. आनंदऋषी हॉस्पिटल ते सक्कर चौक रस्त्यावरील कचरा, हरित कचरा, प्लॅस्टिक कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला.आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून आनंदऋषी हॉस्पिटल ते सक्कर चौक परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागानगरे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील कचरा समस्या कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू आहे. महिनाअखेरीपर्यंत हा प्रश्न मार्गी लागणार आहे. याच दरम्यान, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महानगरपालिकेने मोहीम हाती घेतली आहे. स्वच्छता ही सेवा अन् प्रत्येकाची जबाबदारीही आहे. स्वच्छतेच्या या पंधरवड्यात सहभागी होऊन आपणही स्वच्छ अहिल्यानगर, सुंदर अहिल्यानगर घडवण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.
दरम्यान, अहिल्यानगर महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण व माजी वसुंधरा अभियान अंतर्गत सावेडी परिसरात सायकल तसेच पायी रॅलीद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. हरियाली, स्वच्छता रक्षक समिती, रोटरी क्लब, अहिल्यानगर सायकलिस्ट असोसिएशन, युवान, शासकीय तंत्रनिकेतन आदी संस्थांचे प्रतिनिधी यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांनी “स्वच्छ अहिल्यानगर – आपली जबाबदारी” या प्रतिज्ञेसह स्वच्छतेचा संकल्प केला . उद्या सोमवारी स्वच्छता अभियान डीएसपी चौक ते तारकपूर बस स्थानक ते राधाबाई कॉलेज रस्ता या भागात राबवण्यात येणार आहे. यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.