श्रीरामपुर (जनता आवाज वृत्तसेवा):- बळीराजा कधी नव्हे एवढा अडचणीत सापडला असून सततच्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेले पीक नजरेसमोर पाण्यात सडत आहे तरी सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५०हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती आ. ओगले यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पंधरा दिवसांपासून मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून त्यामुळे शेती व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे
अतिवृष्टीमध्ये कपाशी सोयाबीन, मका, कांदा, भाजीपाला, फळबागा व जनावरांच्या घास पिकाचे देखील नुकसान झाले आहे. तसेच नदी व ओढ्याच्या लगतची शेती खरडून गेली असून सौर कृषी पंप देखील वाहून गेले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील श्री प्रकाश खपके या तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे आधी घेतलेल्या पीक कर्जाचा धसका घेऊन आत्महत्या केली आहे अशी भयावह परिस्थिती सध्या संपूर्ण मतदारसंघात आहे.
सदर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून सरसकट पंचनामे करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी जेणेकरून अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला हातभार लागेल. शेती व पीक मालाची हानी मोठी आहे तरी आपण तातडीने याबाबत प्रशासनाला सूचना द्याव्यात आणि लवकरात लवकर संपुर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.



