अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा): – अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे.त्यामुळे वाहन चालकांना व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करणे आवश्यक आहे. या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामात लक्ष घालावे, अशी विनंती आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी लोणी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन केली. अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची सविस्तर माहिती दिली व तातडीने काम सुरू करण्याबाबत विनंती केली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवर संपर्क करून छत्रपती संभाजीनगर रस्त्याची माहिती घेतली व दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या तत्परतेबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे आभार मानले. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील व शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.



