शेवगाव(जनता आवाज वृत्तसेवा):-चार वर्षांची प्रतीक्षा, चर्चांचा गाजलेला धूर आणि ओबीसी आरक्षणाच्या गुंत्यात अडकलेली प्रक्रिया — अखेर आज शेवगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदावरचा पडदा उघडला गेला. राज्य शासनाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीत शेवगाव नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित ठरले आहे. या निर्णयाने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली असून, शहरात आता “महिलाराज” दिसणार आहे.
नगराध्यक्षपद महिलांसाठी खुले झाल्याने शेवगावच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होऊ लागली आहेत. अनेक पुरुष नेत्यांचे स्वप्न धुळीस मिळाले असले तरी शहरातील सक्षम आणि कार्यकर्त्यांमध्ये सक्रिय असलेल्या महिलांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
गेल्या चार वर्षांपासून नगरपरिषद निवडणुका न होण्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशा आणि मरगळ होती. पण आजच्या आरक्षण घोषणेनंतर शहरात पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. पक्षांतील अंतर्गत चर्चांना वेग आला असून, अनेक महिला नेत्यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय गल्लीबोळात रंगली आहे.शहरातील मतदार आता उत्सुकतेने विचारत आहेत —
“शेवगावच्या नगराध्यक्षपदी कोणती महिला बसणार? तिच्या स्वतःच्या कर्तृत्वाने की राजकीय घराण्याच्या पाठबळावर?”
पक्षबांधणी, गटबाजी आणि नव्या उमेदवारांचा शोध या सगळ्याची सुरुवात आजच्या सोडतीनंतर झाली आहे. शेवगावच्या राजकारणात महिलांचा प्रभाव वाढणार, हे निश्चित!
चार वर्षे प्रतीक्षेत राहिलेल्या नगरपरिषद निवडणुकीला आता गती मिळणार असून, या निवडणुकीत शेवगावच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू होणार आहे . आणि तोही “महिलांच्या नेतृत्वाखाली”!



