राहुरी(जनता आवाज वृत्तसेवा):-नगर-मनमाड मार्गावर राहुरी सुतगिरणी नजीक असलेल्या साई शिवराम पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता घडली आहे.
नगर मनमाड रस्ता हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे रस्त्याचे अत्यंत धिम्यागतीने व निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना सातत्याने होत आहे. राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात फ्रुट विक्रीचा व्यवसाय करत असलेला असलम बशीर सय्यद हा ३१ वर्षीय तरुण राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोड येथील रहिवासी असून गेल्या काही दिवसांपासून तो कुटूंबासोबत तनपुरे साखर कारखान्याच्या कॉलनीत रहावयास होता.
आज सकाळी राहुरी फॅक्टरीकडून विद्यापीठला दुचाकीवरून निघाला. मात्र काही कामानिमित्त राहुरी फॅक्टरीकडे परत वमाघारी परतला असताना शिवराम पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे व स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य करून राहुरी फॅक्टरी येथील सुर्या हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर राहुरी येथील सरकारी रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी असलम सय्यद यास मृत म्हणून घोषित केले. मयत अस्लम याच्यामागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा ,एक मुलगी, दोन भाऊ , बहीण असा मोठा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.