लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे गेल्या एक महिन्यापासून पिंजऱ्याला हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. लोणी बुद्रुक जनसेवा कार्यालया जवळील हळपट्टी शिवारात सौ मनिषा श्याम कोते यांच्या ४७१/१ गटात गायांच्या गोठ्याशेजारील शेतामध्ये लावलेल्या पिंजाऱ्यामध्ये ४ ते ५ वर्ष वयाचा नर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग व प्राणीमित्र यांना यश आले.
गेल्या काही महिन्या पासुन दोन बिबट्यांचा मुक्त संचार परीसरात वाढला होता व परिसरातील पाळीव कुत्र्यांचा या बिबट्यांनी फडशा पाडला होता. म्हणुन मनिषा कोते यांनी पिंजाऱ्याची मांगणी केली होती त्यांनतर वनविभागाने तात्काळ पिंजरा उपलब्ध करून दिला.
सुरुवातील भक्ष म्हणुन कोंबड्या ठेवल्या . पण कोंबड्यांना बिबट्या आकर्षित झाला नाही. त्यांनतर त्यांनी काही दिवस भक्ष म्हणुन शेळी ठेवून पाहिली पण बिबट्या काही जेरबंद होत नव्हता म्हणून काल संध्याकाळी कुत्र्याचे पिल्लु भक्षाच्या पिंजऱ्यात ठेवले आणि पहाटे ५ वाजे दरम्यान दरवाजाचा आवाज आल्यावर ग्रामसेवक राम कोते व कामगार भारत शिंदे व हरी बर्डे यांनी बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री केली व तात्काळ पहाटे प्राणीमित्र विकास म्हस्के यांना कळवले.
माहिती मिळताच प्राणीमित्र विकास म्हस्के, वनरक्षक प्रतिक गजेवर घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती अहील्यानगरचे उपवनसंरक्षक अधिकारी श्री धर्मवीर शालविठ्ठल, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी श्री गणेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री निलेश रोडे यांना माहिती दिली.
तोपर्यंत वनविभागाच्या वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक गजेवर व विकास म्हस्के यांनी पंचनामा करून पिंजरा हलविण्याची कार्यवाही केली.
दरम्यानच्या काळात बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी परीसरात पसरल्यामुळे बघ्यांची खुप मोठी गर्दी जमली होती ही गर्दी पांगवण्यासाठी मंगेश दिघे, सी एम विखे, अजय बोधक, राम कोते , श्रीपाद दिघे, रमेश विखे, गोरक्ष विखे, संजय दिघे, शैलेश विखे, सुरज कुरकुटे, राहुल दिवटे,डॉ मुसळे यांनी मदत केली.
बिबट्याची वैद्यकीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ भालेराव यांनी केली. त्यांच्या निरीक्षणात जेरबंद बिबट्यास शासकीय रोपवाटिकेत ठेवले.
एक बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे भीतीचे वातावरण कमी झाले असले अजूनही दोन मोठे बिबटे परिसरात मुक्त संचार करत असल्याने परिसरातील भीतीचे वातावरण कायम आहे. तेव्हा वनविभागाने या ठिकाणी परत पिंजरा लावावा अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.
काही दिवसापूर्वी ना. विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्री अशोकराव बिडवे हे रात्री उशीरापर्यंत जनसेवा कार्यालयात कामकाज करत असताना साधारण ८: ३० वाजता खिडकीतून बाहेर डोकावले असता मोठा बिबट्या त्यांच्याकडे पाहत खिडकीकडे येताना दिसला. त्यांनी ताबडतोप ऑफिसच्या खिडक्या व दार बंद करून सुरक्षा रक्षकांची मदत घेऊन बाहेर पडले यावेळी ते खूप घाबरलेले होते.. ऑफिस चा दरवाजा उघडा होता तो जर ताबडतोप बंद केला नसता तर बिबट्या जनसेवा ऑफिस मध्ये घुसला असता. अनर्थ टळला.