श्रीगोंदा(जनता आवाज वृत्तसेवा):-शहरात रविवारी दिवाळी सणाच्या खरेदीची लगबग सुरू असताना पिसाळलेल्या कुत्र्याने चार नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
पहिली घटना शहरातील एका हॉटेलसमोर घडली असून दुसऱ्या व्यक्तीला दुकानात चढत असताना कुत्र्याने चावा घेतला. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या आदिवासी समाजातील एका व्यक्तीला आणि त्यांच्या मुलालाही चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत पेडगाव येथील नवनाथ सुदाम मोहिते, नवनाथ नगर येथील युवराज राजू बिबे, तसेच आदिवासी समाजातील दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. राजू पाटील मोटे यांनी युवराज बिबे यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले नंतर सर्वांना श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, नगर येथे हलवण्यात आले आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, श्रीगोंदा नगरपरिषदेने मोकाट कुत्रे व जनावरांवर नियंत्रणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. योग्य वेळी कारवाई झाली असती, तर अशी वेळ आली नसती.
देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून लहान मुले आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी उद्या मुख्याधिकारी भगत मॅडम यांची भेट घेऊन नगरपरिषदेने आतापर्यंत काय कारवाई केली याबाबत जाब विचारण्याचे सांगितले आहे. तसेच संभाजी ब्रिगेडच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे.