श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपूर येथील एस.टी. बस आगारातील दुर्लक्षित स्थितीमुळे काल सायंकाळी एक गंभीर अपघात घडला. जर्मनी हॉस्पिटल महानुभाव आश्रमातील शिष्य प्रांजलगुरु लक्ष्मीबाई पंजाबी या पुणतांब्याकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत असताना त्यांच्या डोक्यावर अचानक स्लॅबचा तुकडा कोसळला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून, तीव्र रक्तस्रावामुळे त्या घटनास्थळीच बेशुद्ध पडल्या.
अपघातानंतर त्यांना तत्काळ साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर रफिक शेख यांच्या देखरेखीखाली सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेच्या वेळी एस.टी. आगारातील एकही जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी प्रांजलगुरु लक्ष्मीबाई यांची प्रकृती जाणून घेतली. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करत उपचाराची माहिती घेतली व जखमीच्या प्रकृतीबाबत समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी दोन्ही नेत्यांनी एस.टी. महामंडळावर जोरदार टीका करताना म्हटले की,हा अपघात महामंडळाच्या हलगर्जीपणामुळेच घडला आहे. जखमी महिलांचा संपूर्ण उपचार खर्च महामंडळाने उचलावा. तसेच बस आगारातील जीर्ण इमारतींची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांतर्फे तीव्र आंदोलन उभारले जाईल.”दरम्यान, दिवाळीच्या अगोदरच श्रीरामपूर, संगमनेर व नेवासा या तीन बस डेपोंमध्ये डिझेल टंचाईमुळे अनेक बसेस बंद ठेवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोय झाली होती.
त्या पार्श्वभूमीवर पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे.यावेळी राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवाजी दांडगे सिद्धार्थ युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल कुमार मिसाळ आदी उपस्थित होते.