मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा) :- मुंबईत सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे एक मोठा राजकीय बॉम्ब फोडणार आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीप्रमाणे, आदित्य ठाकरे या मेळाव्यात मुंबईतील मतदार याद्यांमधील प्रचंड घोटाळ्याचा पर्दाफाश करणार आहेत.
दिल्लीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जसा बोगस मतदारांचा विषय पुराव्यांसह मांडला होता, तसाच प्रकार आदित्य ठाकरे मुंबईत सादर करणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मागील काही महिन्यांत मुंबईतील मतदार याद्यांची स्वतंत्र तपासणी केली असून, त्यात असंख्य विसंगती, डुप्लिकेट आणि बनावट मतदार नोंदी आढळल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या महापालिका निवडणुकीआधी हा विषय राजकीयदृष्ट्या मोठा वाद निर्माण करू शकतो.
वरळी डोम येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजता हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे सर्व मुंबईतील पदाधिकारी, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख आणि शाखाप्रमुख उपस्थित राहणार आहेत. आदित्य ठाकरे या कार्यक्रमात मल्टिमीडियाच्या माध्यमातून सादरीकरण करणार असून, मुंबईतील मतदार याद्यांमधील त्रुटी आणि बोगस नोंदींचे पुरावे ते दाखवतील, अशी माहिती समोर आली आहे.
या सादरीकरणात शिवसेनेच्या तज्ञ टीमने मतदार नोंदणीतील पॅटर्न, अचानक वाढलेले मतदान क्रमांक आणि बाहेरील राज्यातील मतदारांची नावे यांचा तपशील तयार केला आहे. सूत्रांनुसार, हे केवळ मतदार यादीतील चुकाच नाहीत, तर नियोजनबद्ध फेरफार आहेत, असा दावा ठाकरेंच्या गटाकडून केला जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने गेल्या काही महिन्यांपासून मतदार यादीतील घोटाळ्याचा मुद्दा सातत्याने पुढे आणला आहे. आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही अनेकदा निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल करून मतदार नोंदणीची पारदर्शकता मागितली होती. मतदार यादीच दोषपूर्ण असेल, तर निवडणुकीला अर्थ उरत नाही, असे ठाकरेंचे मत आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बाहेरील मतदारांना याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले, असा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने यापूर्वी केला होता. त्यांच्या मते, बिहार, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांतील मतदारांची नावे याद्यांमध्ये आढळतात, तर स्थानिक रहिवाशांची नावे गायब आहेत, ही स्थिती लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहोचवणारी आहे. ठाकरेंच्या गटाने निवडणूक आयोगाला वारंवार निवेदन दिले असले तरी अजून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
ठाकरेंच्या या निर्धार मेळाव्याला राजकीय वर्तुळात प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या गटाने घेतलेला हा आक्रमक सूर भाजप आणि शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरू शकतो. उद्धव ठाकरे या मेळाव्यात कार्यकर्त्यांना निवडणूक तयारीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत, तर आदित्य ठाकरे थेट बोगस मतदान या मुद्यावर दस्तऐवजीकरणासह भूमिका मांडणार आहेत. पक्षाच्या सूत्रांनुसार, हा मेळावा म्हणजे केवळ सभा नाही, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा निवडणूक मोर्चा सुरू होण्याचा पहिला टप्पा आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी ठाकरेंच्या निर्धार मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
बिहारसारखा नमुना दाखवणार ठाकरे
शिवसेना ठाकरे गटाने बिहारच्या निवडणुकीतील मतदार यादीचे उदाहरणही पुढे केले आहे. बिहारमध्ये मतदार यादीची छाननी केल्यानंतर जवळपास 48 लाख बोगस मतदार वगळले गेले होते. त्याच धर्तीवर मुंबईतील मतदार याद्या तपासल्यास किती मोठ्या प्रमाणावर डुप्लिकेट किंवा मृत व्यक्तींची नावे नोंदवली गेली आहेत, हे आदित्य ठाकरे सोमवारी सादरीकरणात दाखवणार आहेत.




