राहाता(जनता आवाज वृत्तसेवा):- गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,निर्धारीत वेळेत काम पूर्ण करून आवर्तनाची व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे धोरण महायुती सरकारने घेतले आहे.गोदावरीचे कालव्याचे नूतनीकरण करण्याच्या दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती होत असल्याचे समाधान जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
गोदावरी कालव्यांच्या ६५ते १०७ मधील वितरण व्यवस्थेच्या कामाचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास अधिक्षक अभियंता राजेश गोवर्धने कार्यकारी अभियंता सोनल शहाणे उपअभियंता विवेक लव्हाट डॉ धनंजय धनवटे, काळे कारखान्याचे व्हा चेअरमन प्रविण शिंदे बाबासाहेब कोते डॉ संपतराव शेळके सौ.रंजना लहारे सौ.कविता लहारे,भाजपाच्या महीला जिल्हाध्यक्षा सौ.शोभा घोरपडे किसान मोर्चाचे बाळासाहेब भोरकडे उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,शंभर वर्ष पूर्ण झालेल्या गोदावरी कालव्यांना यापुर्वी कोणालाही निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.राज्यात महायुतीची सता आल्यानंतर सिंचन प्रकल्पांच्या कामास तसेच कालव्याच्या सुधारणेच्या कामास निधी देण्याची तरतूद प्राधान्याने झाली.कारण ही सर्व जुनी व्यवस्था बदलून लाभक्षेत्राला दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न डॉ बाळासाहेब विखे पाटील आणि स्व.गणपतराव देशमुख यांनी पाहीले.त्याची पूर्तता म्हणजे आजचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
कुकडी कालव्यांचा उल्लेख करून मंत्री विखे म्हणाले की, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना कधीही निधी मिळाला नाही.अनेकजण फक्त राजकारणासाठी आले.पण या जिल्ह्याला मदत करण्याचे दायित्व जाणते राजे दाखवू शकले नसल्याची खंत व्यक्त करतानाच,राज्यातील सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण रोखण्याचा निर्णय आपण पुढाकार घेतल्यामुळे थांबला.त्याचा परीणाम म्हणून गणेश सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहीला.विखे पाटील कारखान्याने तोटा सहन करून तो चालवला.आता कारखाना कोणीही चालवावा, पण भूमिका घेतली नसती तर शेतकर्यांची मालकी राहीली नसती.
राज्यात महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आहे.आपतीच्या काळात ३२हजार कोटी रुपयांच्या मदतीची केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.राहता तालुक्यात ४२ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना झाली असून वाकडी संभाजीनगर आणि धनगरवाडी या गावातील तीन हजार शेतकऱ्यांना १कोटी ८९लाख रुपये आणि रब्बी हंगामचे अनुदान २कोटी ५०लाख मंजूर झाले.जलजीवन योजनेसाठी २९कोटी रूपयांचा निधी देण्यात आला असून ग्रामपंचायत कोणाकडे याचा कोणताही राजकीय विचार न करता शेती महामंडळाची ११एकर जमीन योजनेसाठी दिल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी आपल्या भाषणात यापुर्वी मंत्री असताना या कालव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.मात्र मध्यतंरीच्या काळात निधी उपलब्ध न झाल्याने कालव्याची दुरावस्था झाली.ना.विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सिंचन सुधारणेच्या बाबतीत होणारे काम महत्वपूर्ण असून पुढील अनेक वर्षाच्या वाटचालीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे असल्याचे त्यांनी सांगितले.



