spot_img
spot_img

खाणीच्या पाण्यात पडून बहीण भावाचा अंत

कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-  तालुक्यातील चांदेकसारे येथे आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जुन्या खाणीच्या खोल पाण्यात बुडून डाऊच खुर्द येथील सख्ख्या भाऊ-बहिणीचा करुण अंत झाला. सार्थक गणपत बडे व सुरेखा गणपत बडे (दोघेही, रा. डाऊच खुर्द) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे डाऊच खुर्द परिसरासह संपूर्ण कोपरगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. डाऊच खुर्द येथील गणपत बडे यांचा मेंढीपालनाचा व्यवसाय आहे. आज त्यांचा मुलगा सार्थक आणि मुलगी सुरेखा हे चांदेकसारे परिसरात जुन्या खोदकाम केलेल्या खाणीजवळ मेंढ्या चारत होते.

मेंढ्या पाणी पिण्यासाठी खाणीजवळ गेल्या असता, त्यातील एक मेंढी पाण्यात पडली. मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखाने प्रयत्न केले, मात्र या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि पाय घसरल्याने ती खाणीच्या खोल पाण्यात बुडू लागली. बहिणीला बुडताना पाहून भाऊ सार्थक याने क्षणाचाही विलंब न करता तिला वाचवण्यासाठी खाणीत उडी घेतली. मात्र खाणीत जास्त पाणी आणि दलदल असल्यामुळे आणि दोघेही घाबरल्यामुळे ते दोघेही पाण्यात बुडाले. आजूबाजूला कपडे धुण्यासाठी थांबलेल्या काही महिलांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने आरडाओरड करून नागरिकांना याबाबत कळवले. यात वेळ गेल्या असल्यामुळे या दोघांना वाचवण्यात अपयश आले.

पोलीस पाटील मीराताई रोकडे, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, उपसरपंच वसिम शेख यांनी घटनेची माहिती तात्काळ कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना दिली. संजय गुरसळ यांनी तरुणांना सोबत घेत घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ हजर झाले. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह खाणीतून बाहेर काढण्यात आले.

रुग्णवाहिकेतून दोन्ही मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर दोन्ही पार्थीवावर डाऊच खुर्द येथे अत्यंत शोकाकुल आणि हृदय हेलावून टाकणार्‍या वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गणपत बडे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कुकडे हे करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!