कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आणि एका मुलीसह वृद्धेचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी मध्यरात्री १२:३० ते १ वाजेच्या सुमारास कोपरगावनजीक टाकळी शिवारात गोळ्या घालून ठार मारले.
नंदिनी प्रेमदास चव्हाण या तीनवर्षीय चिमुरडीचा बुधवारी (दि.५) बिबट्याने बळी घेतला. या घटनेला आठवडाही उलटला नाही, तोच सोमवारी (दि.१०) बिबट्याने शांताबाई अहिलू निकोले (६०) या महिलेला ठार केले होते.
कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात निकोले वस्ती याठिकाणी सोमवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास शांताबाई अहिलू निकोले या घरासमोरील शेतात जनावरांसाठी गवत कापत होत्या.
त्याचवेळी कापसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने शांताबाईंवर हल्ला करून त्यांना पिकात ओढत नेले. शांताबाईचा आवाज ऐकून निकोले वस्तीवरील इतर नागरिक धावले. तेव्हा बिबट्याने त्यांना सोडून पळ काढला; परंतु शांताबाईंचा जागेवरच मृत्यू झाला होता. कोपरगाव राहुरी आणि संगमनेर वन विभागाचे पथक बिबट्याला शोधत होते. अखेर या बिबट्याला पुण्याच्या दोन शूटरकडून ठार मारल्याची माहिती कोपरगावचे वनाधिकारी नीलेश रोडे यांनी दिली.



