spot_img
spot_img

प्रेयसीने चक्क प्रियकराच्या मृतदेहाशी केले लग्न  मुलीच्या प्रियकराचा बाप-भावाकडून खून; मुलीने लावली हळद अन् कपाळीही लावले कुंकू

 (जनता आवाज वृत्तसेवा)

पोटच्या मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध करत बापाने आणि भावानेच 22 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केला. मात्र, या घटनेनंतर अंत्यसंस्कारावेळी जे घडले, ते पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले. माझे वडील आणि भाऊ हरले, पण मरूनही माझा प्रियकर जिंकला आहे, असा आक्रोश करत प्रेयसीने चक्क प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केले. इतकेच नाही, तर तिने प्रियकराच्या नावाने अंगाला हळद लावली, तसेय कपाळावर त्याच्या नावाचे कुंकू देखील लावले. ही घटना नांदेडमध्ये घडली.

नांदेड शहरातील जुना गंज भागात गुरुवारी (दि. 28) संध्याकाळी सक्षम ताटे (वय 22) या तरुणाची गोळ्या झाडून आणि डोक्यात फरशी घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीचे वडील गजानन मामीलवाड यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे.

सक्षमची हत्या झाल्यानंतर त्याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी घरी आणण्यात आले. त्यावेळी त्याची प्रेयसी आंचल मामीलवाड तिथे पोहोचली. सक्षमचा निपचित पडलेला मृतदेह पाहून तिने टाहो फोडला. यावेळी आंचलने एका अनपेक्षित कृतीने सर्वांनाच स्तब्ध केले. तिने सर्वांसमक्ष सक्षमच्या मृतदेहाला हळद लावली आणि स्वतःलाही लावून घेतली. त्यानंतर तिने सक्षमच्या नावाने आपल्या भाळी कुंकू लावले. सक्षमच्या मृतदेहासमोरच तिने लग्नाचे विधी पार पाडले. हे दृश्य पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.

सक्षम ताटे आणि आंचल मामीलवाड यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्या दोघांना लग्न करायचे होते. मात्र, सक्षम वेगळ्या जातीचा असल्याने आंचलच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला सक्त विरोध होता. यापूर्वीही त्यांनी सक्षमला मुलीपासून दूर राहण्याची ताकीद दिली होती. मात्र, तरीही त्यांचे प्रेमसंबंध सुरूच होते. याचाच राग मनात धरून गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलीच्या वडिलांनी सक्षमला जुना गंज भागात बोलावून घेतले. तिथे गजानन मामीलवाड, भाऊ साहिल आणि अन्य साथीदारांनी सक्षमवर हल्ला चढवला. त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर डोक्यात फरशी घालून त्याचा जीव घेतला.

या घटनेनंतर आंचलने आपल्याच कुटुंबाविरुद्ध संताप व्यक्त केला. “सक्षम तुरुंगातून सुटून आल्यापासून माझ्या घरातील लोक त्याच्या हत्येचा कट रचत होते. आमच्या प्रेमाला विरोध म्हणून माझ्या वडिलांनी आणि भावाने त्याला मारले. पण या लढाईत ते हरले आहेत आणि माझा प्रियकर मरूनही जिंकला आहे,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, माझ्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही तिने केली आहे.

या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करत मुख्य आरोपी गजानन बालाजीराव मामीलवाड, साहिल ठाकूर, जयश्री मदनसिंह ठाकूर, सोमाश लखे आणि वेदांत या पाच जणांना अटक केली आहे. या घटनेने नांदेड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!