श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा) :– येऊ घातलेल्या श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवसृष्टी येथे भव्य सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी हजेरी लावलेल्या या सभेत महायुतीने ताकद दाखवत प्रत्यक्षात श्रीरामपूरमधील राजकीय वातावरणच ढवळून काढले. या सभेमध्ये खासदार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे आक्रमक, प्रहारक आणि विकासाभिमुख भाषण हे सभेचे विशेष आकर्षण ठरले.
सभेच्या सुरुवातीलाच डॉ. विखे पाटील यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधत स्पष्ट भूमिका मांडली जिल्हा विभाजनाला आमचा कधीच विरोध नव्हता आणि आजही नाही. जिल्हा विभाजन झाले तरी श्रीरामपूरचा विकास करण्याची जबाबदारी माझी आहे.त्यांच्या या विधानाने एकच जल्लोष उसळला. ते पुढे म्हणाले, सोशल मीडियावरच्या घोषणांनी विकास होत नाही. लोकांच्या आश्वासनांनी भविष्य बदलत नाही; उद्योग, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधा या ठोस कामांतूनच शहराचे भविष्य बदलते. हाच खरा विकासाचा मार्ग असल्याचा त्यांनी जोर दिला.
डॉ. विखे यांनी श्रीरामपूरच्या गेल्या अनेक दशकांतील ठप्प, राजकीय अडथळ्यांनी भरलेल्या विकासावर टीका करत सरळ संदेश दिला ही निवडणूक म्हणजे श्रीरामपूर बदलण्याची शेवटची संधी. नगराध्यक्ष आणि नगरसेवक तुम्ही आमचे निवडून द्या. त्यांनी या निवडणुकीतून शहराला पुढे नेण्याचे आश्वासन देत विकासाचे एक मोठे दृष्टीचित्र मांडले.
सभेत बोलताना ते म्हणाले, श्रीरामपूरकर स्वाभिमानी आहेत. पण स्वाभिमान कोणाचा? असा स्वाभिमान की आमदार मिळवायलाच माणूस श्रीगोंद्यावरून आणावा लागला? छत्रपतींच्या पुतळ्यासाठी ४० वर्षे का लागली? शिवसृष्टीचे काम कोण थांबवत होते? अडथळे कोण घालत होते? असे विचारून त्यांनी पूर्वीच्या कारभार्यांना चांगलेच गोंधळवून सोडले. त्यांनी शिवसृष्टीतील पुतळा उभारणीसाठी वेळोवेळी डावललेले निर्णय, वाढवलेला खर्च, निधी अडवण्याची मानसिकता याचा पाढा सविस्तर वाचला.
सभेत गुन्हेगारी, मागील काळात झालेल्या हल्ल्यांवर आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या संदर्भातील दाखल गुन्ह्यांवर टीका करत ते म्हणाले ज्यांच्या उमेदवारांवर गुन्हे आहेत ते शहरात गुन्हेगारी थांबवणार म्हणतात? विकासाबद्दल बोलायलाही त्यांच्यात धाडस नाही. ही निवडणूक तुमच्या मुलांच्या भवितव्याची आहे. आज संधी दिली नाही तर श्रीरामपूर पुन्हा मागे जाईल. ४० वर्षे एका कुटुंबाला दिली. आता फक्त ५ वर्षे आम्हाला द्या. सभेत पायाभूत सुविधांपासून आरोग्यसेवा, रस्ते, पाणीपुरवठा, औद्योगिक प्रकल्प, स्मार्ट सिटी मॉडेल, शहराचा नकाशा बदलणाऱ्या विविध कामांचा आराखडा सादर करण्यात आला.
विकास व सुशासनाचा मॉडेल म्हणून श्रीरामपूर पुढच्या ५ वर्षांत कसा बदलू शकतो हे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीचा दमदार ताफा व कार्यकर्त्यांचा उस्फूर्त प्रतिसाद या सभेला महायुतीचे प्रतिष्ठीत नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी, रा.कॉ. अजित पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, अशोक कानडे, मा. उपनगराध्यक्ष संजय फंड, उपजिल्हाध्यक्ष दीपक पटारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजडे, महिला शहराध्यक्षा डॉ. स्वाती चव्हाण यांच्यासह महायुतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार, महिला, युवक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग होता. सभेत महिलांनी, तरुणांनी आणि व्यावसायिकांनी दाखवलेला उत्साह हा आगामी निवडणुकीतील महायुतीचा आत्मविश्वास वाढवणारा होता.
या सभेनंतर श्रीरामपूरमधील निवडणूक वातावरण तापले असून राजकीय चर्चा वेगाने रंगू लागल्या आहेत. विरोधी पक्षांमध्ये गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसले. विशेष म्हणजे ही सभा केवळ शक्ती-प्रदर्शन नव्हती तर शहराच्या विकासाचा मार्ग, नेतृत्व कोणाचे याबाबत मतदारांचे नवीन समीकरण घडवणारी ठरली आहे. या सभेतील आणखी एक मोठी राजकीय घटना म्हणजे शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप वाघ यांनी भाजपा मध्ये अधिकृत प्रवेश केला. वाघ यांच्या प्रवेशामुळे महायुतीच्या मतमतांतरात मोठे ध्रुवीकरण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सभेतील डॉ. विखेंच्या भाषणातून आणि प्रचंड गर्दीतून सर्वात एकच संदेश स्पष्ट झाला या वेळीची निवडणूक शहराच्या बदलासाठीचा निर्णायक टप्पा आहे. श्रीरामपूरमध्ये येत्या काही दिवसांत राजकीय तापमान आणखी वाढणार हे निश्चित झाले असून आगामी निवडणूक दोन मुद्द्यांवर केंद्रीत होणार असल्याचे स्पष्ट झाले



