श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर शहरात खळबळ उडविणाऱ्या बंटी जहागिरदार हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले असून, गोळीबार करणारे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. घटनेनंतर संपूर्ण जिल्हाभरात नाकाबंदी करून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कृष्णा शिंनगारे, रवी निकाळजे या दोघांना कोपरगाव हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस कोठडीत घेतल्यानंतर आरोपींची कसून चौकशी सुरू असून, प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आरोपींची पार्श्वभूमी, हत्येमागील नेमका उद्देश, वैरभाव तसेच इतर कोणतेही आर्थिक किंवा वैयक्तिक कारण होते का, याबाबत सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, मयत बंटी जहागिरदार याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली असून, पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणासह त्याच्यावर एकूण १७ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व बाबींचा तपासाच्या अनुषंगाने विचार केला जात असून, प्रकरणातील प्रत्येक दुवा तपासण्यात येत आहे.
या संपूर्ण घटनेबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी माहिती देताना सांगितले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. आरोपींविरोधात संबंधित कायदेशीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयीन प्रक्रियेनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण शांतता असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नागरिकांनी शांतता राखावी व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



