श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा) :- कमी कालावधीत प्रचंड परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या अवैध गुंतवणूक रॅकेटचा श्रीरामपूर तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘ग्रो इन्व्हेस्टर’ नावाची बनावट फर्म स्थापन करून कोणताही परवाना नसताना शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
भोकर शिवारातील हनुमानवाडी, नेवासा रोडवरील श्रीदत्तप्रभु सेवाश्रम परिसरात ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक अरुण काशिनाथ धनवडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने २६ डिसेंबर रोजी छापा टाकला.
छाप्यात संदीपराज मोहिनीबाई कपाटे (वय ३७) यांच्या घरातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, नऊ पासबुक, दहा चेकबुक, रोख १ लाख ४ हजार ६०० रुपये, संगणक, लॅपटॉप, डायऱ्या, कॅश काऊंटिंग मशीन, वॉकी-टॉकी, स्कॅनर, पेनड्राईव्ह तसेच दोन बंद अवस्थेतील तिजोर्या असा सुमारे १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, डिजिटल लॉक असलेल्या तिजोर्या व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे पासवर्ड न मिळाल्याने त्यातील माहिती अद्याप तपासता आलेली नाही.
चौकशीत संदीपराज कपाटे व अमोघ संदीपराज कपाटे यांनी संगनमत करून ‘ग्रो इन्व्हेस्टर’ या नावाने फर्म सुरू केल्याची कबुली दिली. प्रत्यक्षात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक न करता लोकांकडून रोख व ऑनलाईन स्वरूपात मोठ्या रकमा स्वीकारून ६० दिवसांत ३५ ते ८२ टक्के परताव्याचे आमिष दाखवण्यात येत होते. सुरुवातीला वेळेवर परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणातील पहिल्या साक्षीदाराने १२.५० लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले असून, नंतर परताव्याऐवजी वाहन देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयितांच्या मोबाईलमधील माहितीच्या आधारे अनेक गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या कोणतीही थेट तक्रार पुढे आलेली नसली, तरी भविष्यात या फसव्या योजनेची व्याप्ती वाढून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अमोघ कपाटे अद्याप चौकशीस हजर न झाल्याने तपासात अडथळे येत असून, बँक खाती, डिजिटल व्यवहार आणि जप्त साहित्याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणामुळे अवैध गुंतवणूक योजनांबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



