श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- नायगाव (ता. श्रीरामपूर) येथे जमीन खरेदीच्या व्यवहारावरून वाद उफाळून येत सशस्त्र टोळक्याने केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून एक व्यक्ती अद्याप बेपत्ता असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत चेतन पेत्रस खाजेकर (वय २३, व्यवसाय – डीजे ऑपरेटर, रा. बेलापूर रोड, श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. नायगाव येथील एका जमिनीचा व्यवहार शिर्डी येथील निलेश दिपक जाधव यांच्यासोबत ठरणार होता. या व्यवहारासंदर्भात २५ डिसेंबर २०२५ रोजी जमीन पाहणी करण्यात आली होती. त्या वेळी काही अनोळखी व्यक्तींनी ‘येथे जमीन घेऊ नका’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर ११ जानेवारी २०२६ रोजी दुपारी पुन्हा व्यवहारासाठी संबंधित मंडळी नायगाव येथे आली असता, काही काळ थांबूनही मध्यस्थ चंद्रशेखर आगे न आल्याने परिसरातच थांबण्यात आले. याच वेळी फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ व इरटिगा वाहनांतून आलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. अर्जुन दाभाडे याने गावठी कट्यासदृश शस्त्राने धमकावले, तर इतरांनी लाकडी दांडके, लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्यांचा वापर करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या हल्ल्यात निलेश एकनाथ शेंडगे यांना गंभीर मारहाण करण्यात आली असून ते घटनेनंतर बेपत्ता झाले आहेत. तसेच फिर्यादी चेतन खाजेकर यांच्या गळ्यातील सुमारे सात ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर घाबरून सर्वजण घटनास्थळावरून पळून गेल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू असून, या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली



