अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा) :- तुम्ही राहत असलेल्या सोसायटीची इमारत ज्या जागेवर उभी आहे, ती जमीन अजूनही बिल्डरच्याच नावावर आहे का? असे असल्यास भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मात्र आता बिल्डरची टाळाटाळ चालणार नाही. सोसायट्यांना त्यांच्या हक्काची जागा स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी सहकार विभागाने जिल्ह्यात ‘मानीव अभिहस्तांतरण’ ही विशेष मोहीम सुरू केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.
कायद्यानुसार इमारत पूर्ण झाल्यानंतर संबंधित जागेचे अभिहस्तांतरण सोसायटीच्या नावावर करणे बिल्डरवर बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी बिल्डर जाणूनबुजून ही प्रक्रिया रखडवतात. परिणामी पुनर्विकास, वाढीव एफएसआय, बँक कर्ज किंवा अन्य कायदेशीर प्रक्रियांमध्ये सोसायट्यांना मोठा अडथळा निर्माण होतो.
ही अडवणूक दूर करण्यासाठी शासनाने ‘मानीव अभिहस्तांतरण’ची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. जर बिल्डर जागा सोसायटीच्या नावावर करून देत नसेल, तर सोसायटीने सर्वसाधारण सभेत यासंबंधी ठराव मंजूर करावा. हा ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर केल्यानंतर शासन स्वतः हस्तक्षेप करून संबंधित जागा थेट सोसायटीच्या नावावर करून देणार आहे.
या मोहिमेचा लाभ घेण्यासाठी सोसायट्यांनी आपल्या लेखापरीक्षकांशी किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आले आहे. ही मोहीम म्हणजे वर्षानुवर्षे बिल्डरांच्या दिरंगाईमुळे अडकलेल्या सोसायट्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.



