शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- शेवगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात सिटी सर्व्हे उताऱ्यात दुरुस्ती करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी उपअधीक्षक व त्याचा खाजगी दलाल रंगेहाथ अटकेत सापडल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राने ही धडक कारवाई केली.
या प्रकरणी किरण अशोक कांगणे (वय ५२), पद – उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, शेवगाव (वर्ग–२) आणि देवेंद्र त्रिंबक फुंदे (वय ४०), खाजगी इसम, रा. शेवगाव, यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शेवगाव पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे सुरू आहे.
लाचेची मागणी आणि सापळा तक्रारदार यांच्या नावे असलेल्या मौजे बोधेगाव येथील सिटी सर्व्हे नंबर ४८९ च्या उताऱ्यावर धारण/सत्ता प्रकार ‘फ’ ऐवजी ‘अ’ असा दुरुस्त करण्यासाठी उपअधीक्षक कांगणे यांनी २०,००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
त्यानुसार दि. १९ जानेवारी २०२६ रोजी पडताळणी कारवाईदरम्यान लाचेची मागणी पुन्हा स्पष्ट झाली. पुढे सापळा कारवाईत कांगणे यांनी ही रक्कम खाजगी इसम फुंदे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयाच्या गेटजवळ पंचांसमक्ष फुंदे याने २० हजार रुपये स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
कारवाईत सहभागी अधिकारी ही संपूर्ण कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथील पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
त्यांना पो.हवा. संदीप हांडगे व पो.शि. सुरेश चव्हाण (ला.प्र.वि. नाशिक) यांनी सहकार्य केले.तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक छाया देवरे, काम पाहत आहेत.
या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे, तसेच पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांचे मार्गदर्शन लाभले.
नागरिकांना आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय कार्यालयात लाच मागितली जात असल्यास किंवा भ्रष्टाचाराची माहिती असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.



