spot_img
spot_img

हिंगणीतील विठ्ठल–रुक्मिणी मंदिर चोरीचा छडा! दोन सराईत चोर जेरबंद; १०.५२ लाखांचा चांदीचा ऐवज जप्त

श्रीगोंदा (जनता आवाज वृत्तसेवा) :- श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी येथील विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात झालेल्या चांदीच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला असून, या प्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे १० लाख ५२ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. १३ जाने. रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यातील महादेवाच्या प्रतिकृतीचा १ किलो ८७३ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा चोरून नेला होता. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंदिर चोरीच्या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोनि. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. जुन्या गुन्हेगारी नोंदी, तांत्रिक माहिती व गोपनीय खबरांच्या आधारे तपास सुरू असताना हा गुन्हा भास्कर खेमा पथवे (रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

चार दिवसांच्या शोधानंतर टाकळीढोकेश्वर परिसरात सापळा रचून पथवे याच्यासह राजेंद्र ठकाजी उघडे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी साथीदार संजय गावडे (फरार) याच्यासह मंदिर चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून ५.१० लाख रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम, चोरीसाठी वापरलेली हत्यारे तसेच ५ लाख रुपये किमतीची तवेरा कार असा एकूण १०.५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चौकशीतून अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील आणखी सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. मुख्य आरोपी पथवे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यात १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी बेलवंडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!