spot_img
spot_img

पैशांच्या वादातून भाच्यानेच केला मामाचा खून शिंदा (कर्जत) येथील हत्येचा १५ दिवसांत छडा; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

कर्जत (जनता आवाज वृत्तसेवा) :- कर्जत तालुक्यातील शिंदा येथील भाळावस्ती परिसरात घडलेल्या खळबळजनक खुनाच्या घटनेचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केला असून, मयताचा भाचाच या खुनामागे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पैशांच्या वादातून हा खून झाल्याचे तपासात पुढे आले आहे.

हनुमंत गोरख घालमे (वय ३५, रा. भाळावस्ती, शिंदा, ता. कर्जत) यांचा ६ जानेवारी २०२६ रोजी पहाटे त्यांच्या राहत्या घरी झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने डोक्यात टणक हत्याराने वार करून खून केला होता. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खुनाच्या गंभीर घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी दोन स्वतंत्र पथके नेमण्यात आली. पथकाने घटनास्थळ, मयताचे आर्थिक व्यवहार, पूर्वीचे वाद आणि कौटुंबिक पार्श्वभूमी यांचा सखोल तपास केला.

तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मयत हा आपल्या भाच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तेजस रामदास अनभुले (वय २१, रा. घुमरी, ता. कर्जत) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तेजस याने गुन्ह्याची कबुली दिली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मयत हनुमंत घालमे याच्यावर तेजस व त्याच्या कुटुंबाचे मोठे आर्थिक कर्ज होते. यापूर्वी वेळोवेळी पैसे दिल्यानंतरही मयताने पुन्हा १० लाख रुपयांची मागणी केली होती. याला तेजसच्या आई-वडिलांनी नकार दिल्यानंतर मयताने आरोपी व त्याच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. या भीतीतून व संतापातून तेजस अनभुले याने टणक वस्तूने मामाच्या डोक्यात वार करून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०९/२०२६ अन्वये हजर करण्यात आले असून, पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!