अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):- शहरात वाढत चाललेल्या नशेच्या अवैध व्यापारावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक . सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन व औषधी बॉटल्या विक्री करणाऱ्या एका इसमास रंगेहाथ पकडले. या कारवाईत ११ हजार ६१३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अनंत सालगुडे, गणेश लबडे, संतोष खैरे, सुयोग सुपेकर, दिपक घाटकर, रोहित येमुल, अमोल आजबे, उत्तरेश्वर मोराळे तसेच महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे यांचे पथक तयार करून शहरात अवैधरित्या नशेची इंजेक्शने व औषधी बॉटल्या विकणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत होती.
दि. २३ जानेवारी रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास बागडपट्टी परिसरातील सिद्धेश्वर मंदिराजवळ एक इसम संशयास्पदरीत्या थांबलेला असल्याची माहिती पथकास मिळाली. सदर इसम डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्रीस प्रतिबंधित असलेली औषधे व इंजेक्शन कुरिअरद्वारे मागवून त्यांची विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने छापा टाकून रोहित रघुनाथ बांगर (वय २५, रा. बागडपट्टी, अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ३७ औषधी बॉटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत ११ हजार २९९ रुपये आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ गणेश शिवनाथ लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, १२५ व २७८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनांनुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी केली असून, शहरातील नशेच्या अवैध व्यापाराविरुद्ध कठोर भूमिका कायम राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



