spot_img
spot_img

श्रीरामपूर तालुक्यात ११ गावांत स्त्री जन्मदर चिंताजनक; पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई – अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर: तालुक्यातील ११ गावांमध्ये स्त्री-पुरुष जन्मदरात मोठ्या प्रमाणावर विषमता आढळून येत असून, मुलींचा घटत चाललेला जन्मदर ही गंभीर सामाजिक बाब बनली आहे. यामागील कारणांचा सखोल शोध घेतला जाईल. कोणीही गैरप्रकारे गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला.

बेलापूर खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध योजना तसेच मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी उपाय व मार्गदर्शन या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी किरण सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के, महिला व बालविकास अधिकारी शोभाताई शिंदे, सरपंच सविता राजुळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे म्हणाले, “बेलापूर खुर्द गावात मुलींचा जन्मदर अत्यंत कमी आहे. गावात किंवा परिसरात कोणीही बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करत असल्यास त्याची माहिती पोलीस किंवा महसूल विभागाला द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. मुलगा-मुलगी असा भेद करू नका. मुलगी ही घराची लक्ष्मी आहे. आज मुलींची संख्या कमी असल्यामुळे अनेक तरुण विवाहापासून वंचित राहत आहेत. याला समाजातील प्रत्येक घटक जबाबदार आहे.”

ते पुढे म्हणाले की, हा विषय केवळ आरोग्य विभागापुरता मर्यादित नसून सामाजिक व कायदेशीर भान ठेवणे अत्यावश्यक आहे. ग्रामपंचायत स्तरावर मुलींच्या जन्माचे स्वागत करणारे उपक्रम सर्वत्र राबविले गेले पाहिजेत..

उपविभागीय अधिकारी किरण सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “जी महिला घर चालवू शकते, ती तालुका, जिल्हा आणि देशाचे नेतृत्वही करू शकते. महिलेला कमकुवत समजू नका. स्त्री-पुरुष समानतेची भावना अंगीकारली पाहिजे. मुली आज सर्वच क्षेत्रांत यशस्वीपणे काम करत आहेत. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. कोणी चुकीचे कृत्य करत असल्यास शासन निश्चितच कारवाई करेल.”

महिला व बालविकास अधिकारी शोभा शिंदे म्हणाल्या, “मुलींचे प्रमाण कमी झाल्यास त्याचे दूरगामी आणि गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागतील. गर्भलिंग निदान चाचणी करू नका, मुलीला गर्भातच मारू नका. शासनाने ‘लेक लाडकी’सारख्या योजना सुरू केल्या आहेत. ग्रामपंचायत व सामाजिक स्तरावर मुलीच्या जन्माचे स्वागत करून जनजागृती करणे आवश्यक आहे.”

यावेळी गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के आणि ज्येष्ठ पत्रकार मारुतराव राशिनकर यांनीही आपले विचार मांडले.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणाली भगत यांनी केले, सूत्रसंचालन रवींद्र बारहाते यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपसरपंच अ‍ॅड. दीपक बारहाते यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!