spot_img
spot_img

नेवासारोड रेल्वे ओव्हरब्रिजवर भीषण अपघात; परीक्षा देण्यासाठी निघालेल्या १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):-  शहरातील नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिज येथे बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि इलेक्ट्रिक दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बेलापूर येथील कार्तिक भंडारी (वय १८) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कार्तिक परीक्षा देण्यासाठी जात असताना हा अपघात घडला.

ट्रक क्रमांक (एमएच ५०–३८७७) आणि ओला कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी यांची धडक झाल्यानंतर दुचाकी ट्रकच्या चाकाखाली अडकली. या अपघातात कार्तिक भंडारी गंभीर जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याला माहिती दिली.

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करत नागरिकांच्या मदतीने जखमी कार्तिकला उपचारासाठी येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी लोणी प्रवरा येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान कार्तिकचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे याच रेल्वे ओव्हरब्रिजवर काही दिवसांपूर्वी एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता. पुन्हा त्याच ठिकाणी अशाच प्रकारचा अपघात घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ओव्हरब्रिजवर वाहनांची ये-जा धोकादायक होत असून, दोन्ही बाजूंना स्वतंत्र मार्गिका (लेन) तयार करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!