spot_img
spot_img

प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता हरपला; सर्वपक्षीय शोकसभेत अजितदादांच्या आठवणींना उजाळा  श्रीरामपूर कडकडीत बंद, 

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, श्रीरामपूर शहरातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील आझाद मैदान येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती परिसरात त्यांच्या विमानाला अपघात झाला. या भीषण अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. त्याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात सर्वपक्षीयांच्या वतीने शहर बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड, संगमनेर रोड, नेवासा रोडसह सर्व प्रमुख व्यापारी पेठांमधील व्यावसायिकांनी आपले व्यवहार पूर्णतः बंद ठेवले. शहरात शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला.

सायंकाळी मेन रोडवरील टिळक वाचनालय, आझाद मैदान येथे श्रद्धांजली सभा पार पडली. यावेळी बोलताना माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले, अजित पवार यांचे विमान अपघातात निधन होणे ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. राजकीय वाटचालीत मी कोणत्याही पक्षात असलो तरी त्यांनी नेहमीच मला मदत केली, साथ दिली. एक गतिमान, धाडसी आणि हिम्मतबाज नेता राज्याने गमावला आहे. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती. गावापासून मंत्रालयापर्यंत सर्वच शासकीय यंत्रणांवर त्यांचा वचक होता. अशा नेत्याला श्रद्धांजली अर्पण करताना डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले की, देवळाली प्रवरा हे अजित पवार यांचे जन्मगाव आणि आजोळ असल्याने श्रीरामपूर परिसरावर त्यांचे विशेष प्रेम होते. विधिमंडळात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ‘तू माझ्या आजोळचा आमदार आहेस’ असे म्हणून नेहमी पाठीवर हात ठेवणारे दादा आज आपल्यातून गेले, ही मोठी हानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेसाठी अखंड झटणारा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख होती. त्यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या श्रद्धांजली सभेत माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, नगरसेविका वैशाली चव्हाण, विश्वनाथ औटी, डॉ. रवींद्र जगधने, वंदना जगधने ,केतन खोरे, भाजप तालुकाध्यक्ष बाबासाहेब चेडे, नगरसेवक लकी सेठी, शिवसेनेचे सचिन बडदे, राजेंद्र देवकर, अभिजीत लिप्टे, अरुण नाईक, माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, नगरसेवक संजय गांगड, राजेंद्र पवार, नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष तौफिक शेख,नगरसेवक मुजफ्फर शेख, बापूसाहेब सदाफळ, जोएफ जमादार, तिलक डुंगरवाल, कॉ. जीवन सुरुडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, निलेश भालेराव, रितेश एडके, सलीमखान पठाण, बाळासाहेब म्हस्के, मुक्तारभाई शहा, संजय गांगड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, जयश्री जगताप, अर्चनाताई पानसरे, अप्पासाहेब आदिक, सरवरअली सय्यद, संतोष मोकळ, सुरेश ताके, चरण त्रिभुवन, सुभाष त्रिभुवन, संतोष डहाळे, अजित बाबेल, प्रवीण काळे, ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा, श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सलीम पठाण यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार नेते नागेश भाई सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन अखंड मराठा समाजाच्यावतीने शिवाजी भोसले यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!