नेवासा फाटा(जनता आवाज वृत्तसेवा): – तेलकुडगाव येथे त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत भूजल पुनर्भरण या विषयावर एक महत्त्वपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल चोळके हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
डॉ. चोळके यांनी आपल्या मार्गदर्शनात सध्याच्या पाणीस्थितीवर प्रकाश टाकत वाढती लोकसंख्या, घटते पर्जन्यमान व वाढता भूजल उपसा यामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईबाबत सविस्तर माहिती दिली. पावसाचे पाणी साठवणे, जलसंधारणाची कामे, शेततळी, रिचार्ज पिट्स, वृक्षलागवड यांसारख्या उपाययोजनांद्वारे भूजल पातळी वाढवता येते, असे त्यांनी स्पष्ट केले. पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असून त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमास NSS कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रांजल थोरात, प्रा. संतोष जावळे, प्रा. सोमनाथ खेडकर, प्रा. राहुल बोरुडे, प्रा. प्रवीण आवारे, प्रा. आशुतोष पल्हारे, प्रा. नितीन चिरमाडे, प्रा. अनिकेत आरसुळे, प्रा. मंगेश वैरागर व प्रा. आरगडे मयुरेश यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला NSS स्वयंसेवक व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धन व भूजल पुनर्भरणाबाबत जनजागृती झाली असून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.



