नेवासा फाटा(जनता आवाज वृत्तसेवा): – त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. मारुती शेळके यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील यशाचा मूलमंत्र सांगत सखोल मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षांमधील वाढती स्पर्धा, बदलती परीक्षापद्धती आणि विद्यार्थ्यांसमोरील मानसिक ताण या सर्व बाबी लक्षात घेता अभ्यासासाठी योग्य नियोजन, सातत्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रा. शेळके यांनी स्पष्ट केले. अभ्यासक्रमाचे बारकाईने आकलन, दररोज ठरावीक तासांचा अभ्यास, नियमित पुनरावृत्ती, सराव प्रश्नपत्रिका सोडवणे तसेच चालू घडामोडींचा अभ्यास करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. अपयश आले तरी निराश न होता त्यातून शिकत पुढे जाणे हाच यशाचा खरा मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सचिन कर्डिले (त्रिमूर्ती संकुल प्रमुख, ढोरजळगाव) हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी चिकाटी, संयम आणि आत्मविश्वास आवश्यक असल्याचे सांगत अशा मार्गदर्शन कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्ताविक प्रा. गोरख गुंड यांनी करत कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष जावळे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चांगदेव आरसुळे, डॉ. अनुराधा गोरे (समन्वयक – सिनियर कॉलेज) यांच्यासह प्रा. नवनाथ गिते, प्रा. भारती सर, प्रा. खेडकर सोमनाथ, प्रा. प्रांजल थोरात, प्रा. आशुतोष पल्हारे, प्रा. सारिका नागरे आदी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. प्रा. मारुती शेळके यांनी प्रत्येक प्रश्नाला समर्पक, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनामुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी स्पष्ट दिशा, आत्मविश्वास आणि नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.कार्यक्रमाचा समारोप प्रा. सोमनाथ खेडकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.



