अकोले (जनता आवाज वृत्तसेवा) :- अकोले तालुक्यातील शेकईवाडी येथील हॉटेल संकेत बार अँड लॉज येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत एका महिलाची सुटका करण्यात आली असून हॉटेल मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दि. २९ जानेवारी रोजी सकाळी अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील कोल्हार–घोटी रोडवर असलेल्या हॉटेल संकेत बार अँड लॉज येथे देहव्यवसाय चालविला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर पंचासमक्ष लॉजवर छापा टाकला. छाप्यादरम्यान लॉजच्या पहिल्या मजल्यावरील काऊंटरवरून सुनिल शांताराम शिंदे (वय ४५, रा. शेकईवाडी, ता. अकोले) यास ताब्यात घेण्यात आले. तो हॉटेलचा मॅनेजर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पाहणीदरम्यान रूम क्रमांक २ मध्ये एक महिला आढळून आली. चौकशीत संबंधित महिलेकडून आर्थिक फायद्यासाठी देहव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी सदर महिलाची सुटका केली असून हॉटेल मॅनेजरविरुद्ध स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा, १९५६ अंतर्गत कलम ३, ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोले पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ५३/२०२६ नोंदविण्यात आला असून या प्रकरणात हॉटेल मालकासह अन्य आरोपींचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील तसेच अकोले पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.



