तेलकुडगाव (जनता आवाज वृत्तसेवा) :- ग्रामीण विकास व शेतीच्या शाश्वततेसाठी पडीक पडलेल्या जमिनीचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असून, यामधून आर्थिक विकासासोबतच पर्यावरणीय समतोल साधता येतो, असे प्रतिपादन प्रा. संतोष जावळे यांनी केले. ते “पडीक जमीन व्यवस्थापन” या विषयावरील शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चांगदेव आरसुळे होते. प्रा. जावळे यांनी आपल्या मार्गदर्शनात पडीक जमिनीची संकल्पना, त्यामागील भौगोलिक, सामाजिक व आर्थिक कारणे यांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. मृदा धूप, सेंद्रिय घटकांचा अभाव, अपुरे जलव्यवस्थापन तसेच हवामान बदल यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पडीक जमिनीच्या पुनर्वसनासाठी मृदा परीक्षणावर आधारित पीक नियोजन, सेंद्रिय व हिरवळी खतांचा वापर, जलसंधारण उपाययोजना, समोच्च नांगरणी, पिक फेरपालट, बहुपीक पद्धत तसेच वृक्षलागवड व चारापिकांची लागवड या शास्त्रीय उपाययोजनांचा अवलंब करण्यावर त्यांनी भर दिला. शासनाच्या विविध कृषी योजनांचा प्रभावी वापर केल्यास पडीक जमीन आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रदीप नवल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राहुल बोरुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.निकिता बर्गे यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून प्रा. सचिन कर्डिले, प्राचार्य संध्या भंगाळे, प्राचार्य डॉ. चोळके, प्रा. संदीप घोडेचोर, प्रा. सोमनाथ खेडकर, प्रा. अक्षय देवतरसे, प्रा . प्रांजल थोरात, प्रा.आशुतोष पल्हारे , प्रा.प्रवीण आवारे, प्रा.मंगेश वैरागर,प्रा. योगिता गायकवाड, प्रा. औटी अश्विनी तसेच सौ. मनिषा राऊत (तेलकुडगाव संकुलन प्रशासक), प्रा . सारिका नांगरे, प्रा.पालवे, प्रा . सोनवणे प्रा.भवर, प्रा.आरगडे उपस्थित होते. या शैक्षणिक कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी व कृषी क्षेत्राशी संबंधित अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



