शेवगाव/पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा) :- शेवगाव व पाथर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी कारवाई करत ५० लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून चार आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. २९, ३० व ३१ जानेवारी २०२६ रोजी शेवगाव व पाथर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे छापे टाकण्यात आले.
पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ७६/२०२६ अंतर्गत ५ ब्रास वाळू व डंपर असा ४०.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात चालक अनिल साहेबराव लबडे याला ताब्यात घेण्यात आले असून डंपर मालक भाऊसाहेब आप्पासाहेब काकडे हा फरार आहे.
शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ६१/२०२६ मध्ये १ ब्रास वाळू (५.१० लाख रुपये) जप्त करण्यात आली असून सुरज परसराम बुटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ७७/२०२६ मध्ये सचिन विठ्ठल बडे याच्याकडून ५.१० लाख रुपयांची वाळू जप्त करण्यात आली आहे.
या सर्व प्रकरणांत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) तसेच गौण खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



