करजगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या सक्त सूचनांनुसार, नेवासा महसूल विभागाने अवैध वाळू उपशाविरोधात धडक मोहीम राबवली आहे.
काल, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते मध्यरात्री ०१:०० वाजेपर्यंत नेवासा बुद्रुक येथील नदीपात्रात हे विशेष ‘सर्च ऑपरेशन’ राबविण्यात आले. या कारवाईदरम्यान नदीपात्रातून वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे तब्बल ७० तराफे / चप्पू जप्त करण्यात आले. हे सर्व साहित्य नदीकाठावर आणून जाळून नष्ट करण्यात आले आहे.
नष्ट केलेले साहित् य: ७० अवैध तराफे/चप्पू.अंदाजित किंमत: एका तराफ्याची अंदाजे किंमत ४०,००० रुपये असून, या कारवाईत एकूण सुमारे २८ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
विशेष मदत: नदीपात्रातील कारवाईसाठी श्रीरामपूर येथून खास बोट व विशेष पथक पाचारण करण्यात आले होते, ज्यांची या मोहिमेत महत्त्वपूर्ण मदत झाली.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी तहसीलदार हिमालय घोरपडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाळू तस्करी खपवून घेतली जाणार नाही. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या अशा घटकांवर यापुढेही प्रशासनाची करडी नजर असून कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील असे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले.



