राहाता दि.१४ (जनता आवाज वृत्तसेवा):-गणेशच्या सभासदांना तालुक्यातील इतर कारखान्यापेक्षा पन्नास रुपये जादा भाव देण्याची विवेक कोल्हे यांची घोषणा म्हणजे निव्वळ सभासदांच्या डोळ्यात केलेली धूळफेक असून,आधी संजीवनी कारखान्याने आपल्या तालुक्यातील इतर कारखान्यापेक्षा पन्नास रूपये जादा भाव देवून दाखवण्याचे आव्हान पुणतांब्याचे सरपंच डॉ धनंजय धनवटे यांनी दिले आहे.
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात डॉ धनवटे यांनी म्हणले आहे की,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बंद पडलेला गणेश कारखाना चालवायला घेवून आठ वर्षे यशस्वीपणे चालवून दाखविला आणि पद्मश्री डॉ विखे पाटील कारखान्या इतकाच भाव सभासदांना दिला.एवढेच नाही तर याचा कोणताही अर्थिक भार गणेश कारखान्यावर येवू न देता तो विखे पाटील कारखान्याने सोसला ही वस्तूस्थिती आहे.
आता विवेक कोल्हे यांनी गणेशच्या सभासदांना पन्नास रुपये जादा देण्याच्या दिलेल्या आश्वासनाची खिल्ली उडवून डॉ धनवटे म्हणाले की,कोपरगाव तालुक्यातील काळे कारखान्याने २ हजार ७७५ रूपये भाव दिला आहे.याउलट संजीवनी कारखान्याने फक्त अडीच हजार रुपये भाव दिला आहे.त्यामुळे आधी तुमच्या तालुक्यातील कारखान्यापेक्षा पन्नास रुपये जादा भाव देवून दाखवावे असे डॉ धनवटे म्हणाले.
गणेश कारखान्याच्या सभासदांनी आपल्या ताब्यात कारखाना देण्याचे कारणच हे आहे की, आपण आपल्या कारखान्याच्या बरोबरीने अथवा जास्त भाव द्यावा. आपल्या जबाबदारीपासून पळवाट काढून सभासदांनी दिलेल्या कौलाचा अपमान करू नये.
गेली अनेक वर्षे गणेश कारखाना तुमच्या ताब्यात होता.तेव्हा सुध्दा आपण गणेश पॅटर्न राबवून संजीवनी एवढा भाव तुम्ही गणेशच्या सभासदांना देवू शकलेला नाहीत.उलट कारखाना कर्जाच्या खाईत लोटून तुम्ही सभासद आणि कामगारांना वार्यावर सोडून दिले.आज ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखाना शेतकर्यांच्या मालकीचाच ठेवून,कर्जमुक्त करून ताब्यात दिला शेतकरी, कामगारांची त्यांच्या काळातील सर्व देणी दिली आहेत. आता आपली वेळ आहे आपल्या काळात थकलेले पगार व इतर देणी लवकर द्यावी. व प्रवरेप्रणाने महिन्याच्या महिन्याला पगार करावेत असेही त्यांनी सुचित केले.
पन्नास रुपये जादा भाव देण्याच्या गोष्टी करताना गणेश कारखान्याला कमी भाव घेण्याची सवय आपणच लावली हे तुम्ही कसे विसरता ॽ परंतू आता सभासदांनी आपल्याला जास्त भाव मिळेल या अपेक्षेने कारखाना तुमच्या ताब्यात दिला असल्याची आठवण करून देत संजीवनीपेक्षा पन्नास रुपये जास्त भाव देवून आश्वासनाची पूर्ती करावी आशी विनंती डॉ धनवटे यांनी केली आहे.




