spot_img
spot_img

जलसंवर्धनाबरोबरच सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी ओढे,नाले अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प

राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):-जलसंवर्धनाबरोबरच सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी ओढे,नाले अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प जलसंपदा विभागाने केला आहे. प्रत्येक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून, जलसंपदा विभागाचे प्रशासन अधिक गतिमान करण्याचा निर्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवड्याच्या निमित्ताने करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. राहाता तालुक्यातील उपक्रमाची सुरुवात पंचायत समितीच्या लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील सभागृहामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात झाली.

नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर, शिर्डीच्या नगराध्यक्षा सौ.जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, जलसंपदा विभागाचे अभियंता प्रदीप हापसे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, अभियंता लव्हाट यांच्यासह जलसंपदा विभागातील अधिकारी, पदाधिकारी आणि संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. दिनांक १५ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान हा कृती पंधरवडा संपन्न होणार असून, यामध्ये प्रामुख्याने नागरिकांच्या सहभागाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या पंधरवड्याच्या निमित्ताने जलसंपदा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण, शेतकरी व पाणी वापर संस्थांशी संवाद, जागतिक महिला शेतकरी वर्ष विचारात घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन, धरण, कालवा, नदी प्रदूषणमुक्त करणे, सिंचनासाठी ई-प्रणाली, महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावर जललेखापरीक्षण तयार करणे. तसेच ओढे, नाले अतिक्रमणमुक्त करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिनांक २५ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान गोदा ते नर्मदा जलदिंडीचे आयोजन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा केलेला संकल्प महत्त्वाचा असून, सिंचन प्रकल्पांना गती देतानाच गोदावरी आणि निळवंडे लाभक्षेत्रातील कालव्यांच्या कामांना गती देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सुरू केलेल्या कार्यवाहीमुळे शेवटच्या शेतकऱ्याला यामुळे पाण्याचा लाभ मिळेल.

अभियंता प्रदीप हापसे यांनी जलसंपदा विभागाने दोन वर्षांत प्रशासकीय स्तरावर पारदर्शकता आणि तंत्रज्ञान याची योग्य सांगड घालून गतिमान निर्णय घेतल्यामुळे प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या कामाला चालना मिळाली. प्रशासकीय स्तरावर रचनात्मक बदलही होत असल्यामुळे कामेही निर्धारित वेळेत पूर्ण होत आहेत. एक लोकाभिमुख विभाग म्हणून जलसंपदा विभागाचा नावलौकिक होत असल्याचा अभिमान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना असल्याचे त्यांनी नमूद केले.

तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी या उपक्रमाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव दिल्यामुळे या पंधरवड्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. अहिल्यादेवी होळकरांनी जलव्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच जलसंपदा विभाग जलसंवर्धनाचे करत असलेले काम शास्त्रशुद्ध आणि नियोजनपूर्वक असल्याचे त्यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!