spot_img
spot_img

जामिनावर आरोपीची मिरवणूक काढणे भोवले पाच जणांना अटक,श्रीरामपूर पोलिसांची कारवाई; ३० ते ४० जणांचा शोध सुरू

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):-  गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला आणि मोक्का कायद्यान्वये कारवाई झालेला सागर भोसले जामिनावर सुटल्यानंतर त्याच्या समर्थकांनी फटाके फोडत, डीजेच्या दणदणाटात काढलेल्या मिरवणुकीवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी कारवाई केली. सार्वजनिक शांतता भंग करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी सागर भोसलेसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, इतर ३० ते ४० जणांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी डीजे यंत्रणाही ताब्यात घेतली आहे.

श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ८/२०२६ मधील आरोपी सागर भोसले याची मोक्का प्रकरणातून जामिनावर सुटका झाल्यानंतर दि. २३ ऑक्टोबर रोजी दत्तनगर परिसरात त्याच्या समर्थकांनी मिरवणूक काढली. या वेळी मोठ्या आवाजात डीजे वाजवून, फटाके फोडून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली.

माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी पोलिस पथकासह दत्तनगर परिसरात धाव घेतली. संविधान चौक, वाकडी फाटा आणि साई कॉर्नर हॉटेलसमोर मोठा जमाव आढळून आला. काही जण चारचाकी व दुचाकी वाहनांवरून फिरत मोठ्या आवाजात गाणी लावत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी जमावाला समज देण्याचा प्रयत्न केला असता, सागर भोसले याने ‘हे सर्व लोक माझ्यासाठी आले आहेत,’ असे सांगितल्याचे पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानंतर हा जमाव दत्तनगर चौकातून टिळकनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात गेला. तेथे अविनाश गंगावणे यांच्या टाटा छोटा हत्ती वाहनावर (एमएच १४ एझेड ४७६२) मोठ्या आवाजात गाणी लावून जल्लोष करण्यात आला.

डीजे बंद करण्याच्या पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम २८७, १८९, २७०, २९२, ३१३, १९२, २२३, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १३५ तसेच ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

पाच जणांना बेड्या

या प्रकरणी सागर श्रावण भोसले (रा. दत्तनगर), अमित रविकांत पठारे (रा. दत्तनगर), संदीप सोपान औटी (रा. श्रीरामपूर), देवा किरण साळवे (रा. टिळकनगर) आणि अविनाश सजन गंगावणे (रा. टिळकनगर) यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

सागर भोसलेवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

पोलिसांच्या माहितीनुसार, सागर भोसले याच्यावर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, दरोडा, दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे जामिनावर सुटल्यानंतर शक्तिप्रदर्शन करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी कडक संदेश दिला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलिस उपनिरीक्षक विशाल लहाणे, पोहेकॉ किशोर औताडे, पोलिस कर्मचारी कुलदीप पर्वत व कैलास झिने यांच्या पथकाने केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!