अस्तगाव (जनता आवाज वृत्तसेवा) :- राजकारणात पदे येतात आणि जातात; मात्र पद नसतानाही जनतेकडून मिळणारा सन्मान आणि विश्वास हीच खरी कमाई असते, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
अस्तगाव येथे व्यापारी संकुलाच्या लोकार्पणप्रसंगी तसेच विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी अस्तगावसह पंचक्रोशीतील भाजपा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून अस्तगावसह पंचक्रोशीतील गावांमध्ये दहा कोटी ४१ लाख रुपयांपेक्षा अधिक निधीच्या विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा तसेच व्यापारी संकुलाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या व्यापारी संकुलाला ‘नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुल’ असे नाव दिल्याबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी त्यांनी गरजू छोट्या व्यावसायिकांना व्यापारी संकुलातील गाळे विनामूल्य देण्याची घोषणा करत, या गाळ्यांवर कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचा किंवा पदाधिकाऱ्याचा हक्क राहणार नसल्याचे स्पष्ट केले.
अस्तगावशी विखे पाटील कुटुंबाचे अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे नाते आहे. आजोबा आणि वडिलांपासून या गावाशी ऋणानुबंध जोडले गेले असून, गावाच्या प्रत्येक प्रश्नात योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अस्तगावमध्ये कार्यक्रम घेण्यामागे ग्रामस्थांची भेट घेणे आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या व्यापारी संकुलाचे काम पूर्णत्वास नेणे हा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, व्यापारी संकुल उभारण्यासाठी सुरुवातीला गावातील व्यावसायिकांकडून वर्गणी जमा करण्याचा विचार होता. मात्र, बैठकीत फिटर, पंक्चर काढणारा, टेलर, भांडी विक्रेता, चहावाला आणि किराणा दुकानदार अशा छोट्या व्यावसायिकांची परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या मनात वेगळाच विचार आला. या गरजू व्यावसायिकांकडून पैसे घेऊन संकुल उभारायचे असेल, तर आपल्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जनतेने दिलेली सत्ता आणि पद सर्वसामान्यांच्या उपयोगासाठी आले नाही, तर त्या पदाला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे गाळे बांधून ते गरजू व्यावसायिकांना विनामूल्य देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच व्यापारी संकुलातील गाळ्यांचे वाटप चिठ्ठीद्वारे पारदर्शक पद्धतीने केले जाणार आहे. संबंधित व्यावसायिकांना पंचायत समिती कार्यालयात बोलावून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कोणत्या व्यावसायिकाला कोणता गाळा मिळेल, हे चिठ्ठीद्वारे निश्चित होणार असून, जागेच्या पसंतीवरून वाद न करता सर्वांनी या प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच गावातील पुढारी, पदाधिकारी किंवा राजकीय वजन असलेल्या व्यक्तींना गाळे दिले जाणार नसल्याची भूमिका त्यांनी ठामपणे मांडली.
राजकारणात पद मिळविण्यासाठी होणाऱ्या स्पर्धेवर भाष्य करताना त्यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचा संदेश दिला. सरपंच, सोसायटीचे चेअरमन किंवा बाजार समितीचे सभापती होण्यापेक्षा पद नसतानाही लोक आपल्याला सन्मान देतात का, हे अधिक महत्त्वाचे आहे. पदामुळे मिळणारा सन्मान तात्पुरता असतो; मात्र जनतेच्या कामातून मिळालेला विश्वास कायम राहतो. त्यामुळे पदामागे धावण्याऐवजी जनतेची कामे निःस्वार्थ भावनेने करावीत, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. पराभवानंतरही कार्यकर्त्यांनी आणि जनतेने आपल्यावरील विश्वास कायम ठेवला. याच प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या बळावर आज जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचता आले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचा संदर्भ देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
गावाच्या विकासकामांचा आढावा घेताना पाणीप्रश्न, गोदावरी कालव्याची कामे, रस्ते आणि पथदिव्यांच्या कामांचा त्यांनी उल्लेख केला. अस्तगावसह मोरवाडी, तरकसवाडी, चोळकेवाडी आणि परिसरातील गावांमध्ये पाणी पोहोचविण्यासाठी झालेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. मोरवाडी तलावातील अतिक्रमणामुळे निर्माण झालेला पाणी साठवणुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या कामाचाही त्यांनी उल्लेख केला. नगर-मनमाड महामार्गाच्या कामामुळे अस्तगाव ते शिर्डी प्रवास अधिक सुलभ झाल्याचे सांगताना त्यांनी रस्त्यावरील पथदिव्यांच्या व्यवस्थेची माहिती दिली. डांगे शाळेपासून सावळीविहीरपर्यंत दर ५० फुटांवर, तर डांगे शाळेपासून कोल्हारपर्यंत दर १०० फुटांवर पथदिवे बसविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच व्यापारी संकुलाच्या परिसराचाही आगामी काळात विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
महिला आणि मुलींची सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय असल्याचे सांगत तालुक्यातील गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जनतेच्या हितासाठी काही वेळा अप्रिय भूमिका घ्यावी लागते. त्यातून राजकीय विरोध किंवा शत्रुत्व निर्माण झाले तरी त्याची पर्वा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जात आणि धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रवृत्तीवरही त्यांनी भाष्य केले. पाणी, रोजगार, रस्ते आणि विकास या प्रत्येकाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यांना कोणताही जातीय किंवा धार्मिक भेद नसतो. विखे पाटील कुटुंबाने कायम सर्वधर्मसमभावाची भूमिका जपली असून, साईबाबांच्या विचारांतून हीच शिकवण मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा उल्लेख करताना डॉ. विखे पाटील भावूक झाले. स्वतःच्या खर्चातून फटाके आणणे, जेसीबीच्या साहाय्याने हार तयार करणे, स्वागताची तयारी करणे आणि स्वतःहून कार्यक्रमाचे नियोजन करणे या गोष्टी कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. एका कार्यकर्त्याने स्वतः गाणे लिहून तयार केल्याचा उल्लेख करताना, कार्यकर्त्यांचे असे प्रेम हीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अस्तगावमध्ये उभारलेले व्यापारी संकुल ही केवळ इमारत नसून गावातील छोट्या व्यावसायिकांसाठी रोजगाराची संधी आहे. पुढील काळात गावातील मतभेद बाजूला ठेवून ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या कामकाजात एकजुटीने पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.




Total Users : 685801