राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी तालुक्यातील प्रवराकाठच्या ३२ गावांसह परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने रस्त्याचे काम तात्काळ करावे या मागणीसाठी टाकळीमिया येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी दि.२२ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांसह उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या इशार्यानंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी तातडीने कार्यवाही केली आहे. त्यामुळे श्री. जाधव यांनी प्रस्तावित उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे.
दरम्यान, राहुरी तालुक्यातील टाकळीमियासह प्रवराकाठच्या ३२ गावातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यानुसार संबंधीत विभागाने त्यांच्या उपोषणाची दखल घेत राहुरी तालुक्यातील राहुरी ते वाघाचा आखाडा, टाकळीमिया ते लाख रस्ता हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत प्रशासकीय मंजूरी प्राप्त होऊन या रस्त्याची निविदा प्रक्रिया झाली असल्याचे लेखी आश्वासन देताना सद्यस्थितीत निविदा प्रक्रिया मंजूरीसाठी शासन स्तरावर असून मंजूरी आल्यानंतर या कामाचा कार्यारंभ आदेश ठेकेदारास देणार असल्याचे पत्र प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता यांनी दिले असल्याची माहिती श्री. जाधव यांनी दिली.
देवळाली प्रवरा, टाकळमिया, पाथरे, तिळापूर या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गुलाबराव निमसे, पत्रकार अक्षय करपे, बाबाभाई शेख, राजेंद्र गायकवाड, सचिन गडगुळे, राहुल करपे, शिवाजीराव शिंदे, बाळासाहेब निमसे, शिवाजीराव जाधव, आप्पासाहेब गडगुळे, हरिभाऊ शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी तक्रार अर्ज करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. या रस्त्यांच्या दूरावस्थेमुळे अनेक वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली होती. या रस्त्यांच्या दूरावस्थेकडे अधिकार्यांनीही दुर्लक्ष केले होते. याबाबत बाळासाहेब जाधव यांनी संबंधीत रस्त्याची पाहणी करून ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून शासन स्तरावर रस्ता दुरूस्तीचा पाठपुरावा केला. दरम्यान यावरही संबंधीत अधिकार्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने जाधव यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. दि.२२ ऑगस्ट रोजी जाधव यांनी ग्रामस्थांसह उपोषणाचा इशारा दिल्यानंतर संबंधीत अधिकार्यांनी रस्त्याच्या दुरूस्तीबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर श्री. जाधव यांनी उपोषण मागे घेतले आहे. शासकीय अधिकार्यांनी तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी याप्रश्नी सहकार्याची भूमिका घेतल्याने अधिकार्यांनी दखल घेतली असल्याचे सांगतानाच प्रवराकाठव्या ३२ गावातील प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे बाळासाहेब जाधव यांनी सांगितले.