लोणी दि.२४( जनता आवाज वृत्तसेवा ):-नेतृत्व गुणांना प्रवरेच्या माध्यमातून नेहमीचं प्रोत्साहन दिले जाते.शिक्षणां सोबतचं विविध उपक्रमामुळे आणि करियर कट्टा यामुळे येथील विद्यार्थी हा उपक्रमशिल आहे, असे प्रतिपादन करीअर कट्टाचे पुणे विभागीय प्रवर्तक डॉ. दीनानाथ पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत लोणीच्या गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयामध्ये करिअर कट्टाच्या फलकाचे अनावरण आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसद समितीचे उदघाटन प्रसंगी डॉ. पाटील बोलत होते.यावेळी प्राचार्या डाॅ.अनुश्री खैरे, उत्तर विभागीय समन्वयक प्रा. नवनाथ नागरे,उपप्राचार्या प्रा. राजश्री तांबे, समन्वयक प्रा. गायत्री गहिरे, प्रा.कुमुदिनी गोंधळी, विभाग प्रमुख डॉ. कांचन देशमुख व प्रा. संजय वाणी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा उत्तर विभागीय समन्वयक प्रा. नवनाथ नागरे यांनी करिअर कट्टा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये कसा महत्वाचा ठरू शकतो याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले तसेच ‘करिअर कट्टा’ अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची देखील माहिती दिली .महाविद्यालयात करियर कट्टा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वर्षभराच्या सर्व कार्यक्रमाचे व विविध कोर्सेसचे योग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी करिअर संसद ची स्थापना करण्यात आली. संसद मध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचे नियुक्ती पत्र देण्यात आले. मुख्यमंत्री म्हणून कु.अनीला उन्नीकृष्णन या तृतीय वर्ष बी.सी.ए. मधील विद्यार्थीनीची नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संसद मध्ये असणाऱ्या विदयार्थीनींनी केले. स्वागत प्राचार्य डॉ अनुश्री खैरे यांनी केले तर प्रास्ताविक महाविद्यालयीन समन्वयक प्रा. गायत्री गहिरे यांनि तर आभार समन्वयक प्रा.कुमुदिनी गोंधळी यांनी मानले.