अहमदनगर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर शहरात सिना नदीचे पात्र सुमारे १३ किमीचे असून यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे, हा गाळ आता जलसंपदा विभागाच्या वतीने काढण्यात येणार असल्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
मुंबई येथे मंत्रालयात ऑनलाइन झालेल्या या बैठकीत अहमदनगर शहरातून जाणाऱ्या सीना नदीच्या पात्रातील मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ आता जलसंपदा विभाग त्यांच्या कडील मशिनरी देवून काढणार असून या मशिनरी करिता लागणारे इंधन हे जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी घेतला असून हा निर्णय झाल्याने अहमदनगर शहरतील सिनानदीची पुर नियंत्रण रेषा ही स्थलांतरित होईल. हा निर्णय नगर शहरासाठी अत्यंत महत्वाचा असून यामुळे पुराचे पाणी नगर शहरात येणार नाही. पर्यायाने नागरिकांचे होणारे मोठे आर्थिक नुकसान हे टाळले जाईल.
नगर शहरातील नागरिक तसेच व्यापारी यांनी या संदर्भात वेळोवेळी मागणी केली होती यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या बाबत पाठपुरावा केला त्यावरून आज मंत्रालयात ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत हा गाळ काढण्यासाठी जलसंपदा अंतर्गत यांत्रिक विभागाला इंजिनियर, मनुष्यबळ व यंत्र सामुग्री पुरवण्याचे आदेश दिले. याबरोबरच यांत्रिकी विभागास लागणारे इंधन हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांना आदेशित केले आहे. या माध्यमातून या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. या नदीतून काढण्यात आलेला गाळ हा पुन्हा या नदी पात्रात येणार नाही अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे या बैठकीत सूचना दिल्या असल्याचे खा. विखे यांनी सांगताना नगरकरांना आता दिलासा मिळाला आहे. एवढंच नाही तर या परिसरातील पूर रेषा आता स्थलंतरित होणार असल्याचे या प्रसंगी त्यांनी सांगितले. नगरकरांची अनेक वर्षांची ही अडचण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडविल्या बद्दल त्यांचे आभार देखील याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
या बैठकीला नियोजन विभागाचे मुख्य सचिव ओ पी गुप्ता, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर ,जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.
दरम्यान या पूर रेषेत येणारे दुकाने, घरे यांना दिलासा मिळाला असून नदीतील गाळ काढल्याने आता ही पूर रेषा स्थलांतरित होणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे या परिसरातील नागरिकांनी खा. डॉ.सुजय विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.
शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांचा पाठपुरावा
दरम्यान मा. ना. राधाकृष्णजी विखे पाटील, मंत्री महसूल, महाराष्ट्र राज्य यांना पूर नियंत्रण रेषेबाबत पुर्न सर्वेक्षण व्हावे यासाठी शेतकरी व बांधकाम व्यावसायिक यांच्यासह वेळोवेळी शहर जिल्हाध्यक्ष अभय तात्या आगरकर यांनी मागण्याचे निवेदन देऊन या संदर्भात कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला होता, या पाठपुराव्यांतर नामदार विखे पाटील यांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, याच आश्वासनाची या निमित्ताने पूर्तता केली आहे. या पूर्तेते नंतर आगरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपुख्यमंत्र अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.