श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):– पाटपाणी व विजेच्या प्रश्नावर तालुक्यातील नागरिकांनी आज झालेल्या आमसभेत पोटतिडकीने प्रश्न मांडले. जनतेच्या भावनांची अधिकाऱ्यांनी दखल घेऊन यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना करून कार्यवाही न झाल्यास जनतेचा रोष अनावर झाल्यास मला दोष देऊ नका, असा इशारा आ. लहू कानडे यांनी दिला.
येथील प्रशासकीय इमारतीत आमदार कानडे यांच्या प्रमुख उपस्थिती आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, माजी जि. प. सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, सचिन मुरकुटे आदी उपस्थित होते.
यावेळी मुरली राउत, बाळासाहेब तनपुरे, पी. आर. शिंदे, दिलीप बकरे, सचिन मुरकुटे, संदीप शेलार, अरुण कवडे, सुधाकर खंडागळे, भारत तुपे, विलास शेजूळ, अनिल ढोकचौळे, बापू सदाफळ, छावाचे नितीन पटारे, शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी पाटपाणी, वीज, घरकुल, अतिवृष्टी अनुदान, पिक विमा, पाट चार्यांची दुरुसती, ओव्हरलोड रोहित्रे, गावतळे भरणे, रेशन कार्ड, जातीचे दाखले, जातीनिहाय जनगणना, जल जीवन पाणी योजना, गावठाण अशा विविध प्रश्नांवर सूचना केल्या.
कमलपूरचे उपसरपंच सचिन मुरकुटे यांनी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना देखील कृषी विभागाचे अधिकारी याबाबतची कार्यवाही करताना उदासिन दिसत असल्याचे म्हटले.पाटबंधारे विभागाचे उप अभियंता संजय कल्हापुरे यांनी सर्वांना पाणी देण्याचा प्रयत्न आहे, सध्या १६ चार्या चालू आहेत, बेलापूर, एनबी व डीवायवन चार्या सोडण्यात येणार आहेत. सात नंबर अर्जासोबत सातबारा उतारे घेण्यात येत नाहीत. मागणीप्रमाणे पाणी देत असल्याचे सांगितले. त्यावर आ. कानडे यांनी, आपला एक कर्मचारी लाच घेताना पकडला त्यानंतर संबंधित चारी लगेचच बंद करण्यात आली. त्या ठिकाणी कर्मचारी नियुक्त केला नाही. हा काय प्रकार आहे. याची लाज वाटली पाहिजे, असे सांगत तेथे माणूस नेमुन तातडीने चारी सोडण्याची सूचना केली. महावितारणचे सहायक अभियंता प्रभाकर माळी यांनी, १५ फीडरचे बाय फार्गेषणचे प्रस्ताव दिले असल्याचे सांगितले असता किती रोहित्रे ओव्हरलोड आहेत ते सांगा, असे आ. कानडे म्हणाले असता ती माहिती नसल्याचे माळी यांनी सांगितले. रोहित्रांवर आकडे टाकल्याने ते ओव्हरलोड होत असल्याचे स्पष्ट करत त्याची चौकशी कोणी करायची, त्यासाठी अधिकारी, कर्मचारी नमून चौकशी करावी, ज्यांच्या कार्यक्षेत्रात ओव्हरलोड होतात त्यांना निलंबित करा, अशा सूचना केल्या.
आमदार निधीतून आपण ५० लाख रुपये मंजूर केले. त्यात १४ रोहित्रे होणार होती. मात्र महावितरणने इन्सेटिव्ह वाढवून केवळ ६ रोहित्र होणार असल्याचे सांगितले. अशी कुरघोडी करत असाल तर अवघड आहे. गोंधवणीच्या ग्राहकांना वीज कनेक्शन न देता त्यांना वीज बिले देत असल्याचा प्रकार भयंकर असल्याचे सांगून लोक संतापले असून त्यांचा उद्रेक झाल्यास मला दोष देऊ नका, असे आ. कानडे म्हणाले. घरकुलांचे प्रस्ताव तयार आहेत. अतीवृष्टीचे अनुदानाच्या याद्या अपलोड झाल्या आहेत, हि प्रक्रिया ऑनलाईन असल्याने येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढू, असे प्रांताधिकारी किरण सावंत यांनी सांगितले.



