4 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

पहिल्या टप्प्यातील २५ टक्के पीक विम्याची रक्कम लवकरच मिळेल – खा.लोखंडे

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-जिल्ह्यातील पावणे सहा लाख शेतक-यांनी सुमारे सहा लाख एकोणऐंशी हजार हेक्टर क्षेत्रातील खरिप पिकाचा एक रूपया हप्ता भरून विमा उतरविला आहे. पावसाने दगा दिल्याने जवळपास पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठविण्याचे काम पुर्ण झाले. त्यांच्याकडून हे प्रस्ताव पिक विमा कंपन्याकडे गेले की काही दिवसात पहिल्या टप्प्यातील पंचवीस टक्के अग्रीम भरपाईची रक्कम शेतक-यांना मिळेल. त्याबाबत आपला पाठपूरावा सुरू आहे. अशी माहीती खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.

बुधवारी राहाता पंचायत समितीच्या सभागृहात दुष्काळी परिस्थीतीच्या पार्श्वभुमीवर पिक विमा भरपाईसंदर्भात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते . तहसिलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उपविभागीय कृषि अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषि अधिकारी आबासाहेब भोरे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, भाजपचे नेते नितीन कापसे, सुनील लोंढे, सागर बोठे, अनिल नळे, अक्षय सदाफळ, बापूसाहेब जटाड, किशोर तरटे व शुभम माडगे आदि पदाधिकारी उपस्थीत होते.

लोखंडे म्हणाले, आपण आज संबंधित अधिका-यांकडून जिल्ह्यातील खरिप पिक विम्याचा आढावा घेतला. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन यातील अडचणी दुर करणार आहोत. सोयाबीन पिकाचे शंभर टक्के नुकसान गृहित धरल्यास हेक्टरी ५७ हजार २६८ रूपये भरपाई अपेक्षीत आहे. पंचवीस टक्के अग्रीम पिक विमा भरपाईची रक्कम पहिल्या टप्प्यात मिळेल. सोयाबीन, मका आणि अन्य पिकांसाठी भरपाईची रक्कम वेगवेगळी आहे. दुष्काळी परिस्थीती लक्षात घेता शेतक-यांना आता पिक विमा भरपाई हा एकमेव आधार राहीला आहे. त्यामुळे लवकरात लवकर विमा भरपाई मिळावी यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्नशील राहील.

ज्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे किंवा होण्याची शक्यता आहे. अशी ठिकाणे निश्चित करून पिण्याचे पाणी पुरविण्याचे नियोजन आतापासूनच करावे लागेल. वैरण आणि पिण्याचे पाणी या दोन समस्या आगामी काळात उदभवण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वेक्षण करण्याच्या सुचना संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

(खा सदाशिव लोखंडे )

 

 

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!