वैजापूर (जनता आवाज वृत्तसेवा:- महसुल सप्ताहाच्या निमित्ताने युवा संवाद अंतर्गत वैजापुरचे तहसिलदार सुनिल सावंत यांनी बुधवारी अभिनव उपक्रम राबवला. याअंतर्गत त्यांनी तहसिलदरासह प्रशासनातील सर्व पदांची जबाबदारी शालेय विद्यार्थ्यांवर सोपवली. करुणानिकेतन विद्यालय, वैजापूर येथील विद्यार्थ्यांना दुपारी बारा ते दोन या वेळेत तहसिल कार्यालय चालवण्याचा अनुभव दिला.
तसेच त्यांच्या सोबत संवाद साधुन त्यांना महसुल प्रशासनासाबाबत मार्गदर्शन केले. करुणानिकेतन ची विद्यार्थिनी कल्पेश शेटे हिने तहसिलदार यांच्या खुर्चीत बसुन सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. अनुष्का कावळे हिने नायब तहसीलदारांच्या खुर्चीत बसुन कामकाज केले. स्नेहल बागुल हिने नायब तहसिलदार (महसुल), अथर्व चव्हाण याने नायब तहसिलदार (निवडणुक), प्रथमेश माळवदे याने नायब तहसिलदार (संजय गांधी विभाग), समृद्धी महापुरे हिने लेखा विभाग, रोहित कदम याने अव्वल कारकुन यांच्या खुर्चीत बसुन काम केले.
नायब तहसिलदार किरण कुलकर्णी, नारखेडे, अव्वल कारकुन दिलीप त्रिभुवन, नितीन येलगटवार, सचिन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पालकांना आपल्या मुलांना अधिकारी म्हणुन काम करतांना पाहुन खुप आनंद झाला. शाळेतील शिक्षकांनी महसुल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. करुणानिकेतन विद्यालय व न्यु हायस्कुल येथे महसुल सप्ताहांतर्गत प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तहसिलदार सुनिल सावंत, मुख्याध्यापक एस. एस. ब्राह्मणे व शिक्षण परिवेक्षक मनीष गणवीर यांनी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण केले. तहसीलदार सुनील सावंत यांनी राबविलेल्या उपक्रमाची सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
वैजापूर येथे महसुल सप्ताहांतर्गत तहसिलदार सुनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करुणानिकेतन विद्यालयाची विद्यार्थिनी कल्पेश शेटे हिने तहसिलदरांच्या खुर्चीत बसुन कामकाज केले.
न्यु हायस्कुल व करुणानिकेतन विद्यालय, वैजापूर येथे शालेय दाखल्यांचे वितरण करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.