कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- गेल्या चार दिवसांपासून कोल्हार भगवतीपूर येथे भगवतीमाता मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेले सकल मराठा समाजाचे उपोषण मागे घेण्यात आले. याकरिता प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार अमोल मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी मध्यस्थी केली. यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा व मराठा महिला पुरुषांना झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ गेल्या चार दिवसांपासून येथे आमरण उपोषण सुरू होते.
प्रांताधिकारी माणिकराव आहेर यावेळी म्हणाले, राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील आम्हाला सूचना केली. उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना शासनाची भूमिका समजावून सांगत संवाद साधा. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन गंभीर आहे ही बाब उपोषणकर्त्यांच्या लक्षात आणून द्यावी. उपोषण मागे घेण्याची विनंती करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. कोल्हार भगवतीपूर येथे आमरण उपोषणाचा काल रविवारी चौथा दिवस आहे. याकाळात आंदोलनाची दखल विविध स्तरावर घेण्यात आली. शासन दरबारी प्रशासनाने योग्य तो पत्रव्यवहार करून उपोषणकर्त्यांच्या भावना पोहोचविल्या जातील असेही प्रांताधिकारी श्री. आहेर यांनी सांगितले.
यानंतरही उपोषणकर्ते सुरुवातीला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बऱ्याच वेळा मनधरणी केल्यानंतर उपोषण सोडण्यात ते तयार झाले. यावेळी जितेंद्र खर्डे, नितीन खर्डे, अभय खर्डे, सोमनाथ खर्डे, अमोल खर्डे, संकेत कापसे या सहा उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देऊन आमरण उपोषण सोडण्यात आले. राजकीय नेत्यांनी तसेच प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची दखल घेतली याचा आम्ही आदर करतो. आम्ही उपोषण मागे घेत आहोत, मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता आमचे आंदोलन यापुढील काळातही अविरत चालूच राहील असा निर्धार उपोषणकर्ते जितेंद्र खर्डे यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमवेत शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे, उपतालुकाप्रमुख सोमनाथ गोरे, श्रीरामपूर शहर प्रमुख सचिन बडदे, राजू शेटे आदी उपस्थित होते. दरम्यान काल रविवारी दुपारी एकनाथ घोगरे, अरुण कडू, बाळासाहेब केरुनाथ विखे आदींनी उपोषणकर्त्यांची समक्ष येऊन भेट घेत प्रवरा शेतकरी मंडळाचा उपोषणास पाठिंबा असल्याचे सांगितले.



