लोणी दि.१३( जनता आवाज वृत्तसेवा):-बदलल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या उपजत कलेतूनही करीअर घडविण्याची सुविधा आहे. विद्यार्थ्यानी पुस्तकी ज्ञानासोबतच सामान्य ज्ञान ही मिळावे यासाठी प्रवरा कला अध्यापक संघाने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रवरा कला अध्यापक संघाने आयोजित केलेल्या चित्रकला, हस्ताक्षर आणि रंगभरण स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी संस्थेचे सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, कला अध्यापक संघाचे अध्यक्ष एम. डी. जरे, उपाध्यक्ष आर.टी. चासकर, सचिव जितेंद्र बोरा संतोष पुलाटे, किशोर आहेर आदीसह विविध शाळांचे प्राचार्य, कला शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ. शालीनीताई विखे पाटील म्हणाल्या शिक्षण घेतानांच विद्यार्थ्यांनी उपजत कलेला ही महत्व देऊन वेळोवेळी होणा-या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन करून विद्यार्थ्यांनी वाचन वेळोवेळी घडत असलेल्या घडामोडी परिसरातील इतिहास समजून घेतांनाच सामान्य ज्ञानवर आधारीत स्पर्धा आयोजित करण्याच्या सुचना देतांनाच पुस्तकी ज्ञानासोबतचं विद्यार्थ्यांना विविध गोष्टीचे ज्ञान शालेय पातळीवर देण्याची गरज व्यक्त केली. यावेळी भारत घोगरे, सौ. लिलावती सरोदे यांनी मार्गदर्शन केले.
प्रारंभी एम. डी. जरे यांनी प्रास्ताविक करतांना स्पर्धेचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन आर. टी. चासकर यांनी तर आभार किशोर आहेर यांनी मानले.



