spot_img
spot_img

डीजे वाजविल्यास जप्त केला जाईल : सपोनी युवराज आठरे कोल्हार येथे शांतता समितीची बैठक संपन्न

कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये ध्वनी प्रदूषणाचे नियम सर्व गणेश मंडळांनी पाळावेत. विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्य वाजवावेत. डीजेचा अट्टाहास कोणीही करू नये. कोणत्याही मंडळाला डीजेचा वापर करू दिला जाणार नाही. अन्यथा डीजे जप्त केला जाईल असा सज्जड इशारा लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिला.

आगामी काळात गणेशोत्सव, ईद – ए – मिलाद, नवरात्र या सणांच्या पार्श्वभूमीवर कोल्हार पोलीस चौकीवर सर्वधर्मीय बांधवांची शांतता समितीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी बोलत होते.

युवराज आठरे म्हणाले, सर्व गणेश मंडळांनी पोलीस ठाण्यामध्ये नोंदणी करावी. जनजागृती होईल असे कार्यक्रम आयोजित केले जावेत. रात्री १२ वाजेच्या आत गणपती विसर्जन झाले पाहिजे. विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणीही मद्य प्राशन करू नये. गुन्हे दाखल होईल असे कृत्य होऊ देऊ नका असे सांगत येथे ईद – ए – मिलादची मिरवणूक सकाळच्या सुमारास निघणार आहे ही चांगली बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

ॲड. सुरेंद्र खर्डे म्हणाले, पूर्वी  कोल्हार भगवतीपूरमध्ये  गणेश मंडळाकडून देखावे सादर केले जायचे. त्यास बक्षिसेही दिली जायची. मात्र अलीकडच्या ४ – ५ वर्षांच्या काळात गणेश मंडळांनी देखावे, आरास करणे बंद केले. त्यामुळे गावची चांगली परंपरा खंडित झाली. गावात असंख्य दानशूर व्यक्ती आहेत. बक्षिसे मिळतील परंतु त्यासाठी देखावे तरी असले पाहिजेत. देखावेच केले जात नाही तर बक्षिसे ठेवायची कशी ? अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पाऊस नसल्याने व्यापारी पेठ शांत आहे. वर्गणीला कोणीही जबरदस्ती करू नये. सद्यस्थितीत गावोगावी अशांतता असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. येथील बाजारपेठ उभी करायला जुन्या लोकांना खूप कष्ट घ्यावे लागले. भांडण, तंटे, हाणामारी, अशांतता असल्यास बाजारपेठेला फटका बसतो असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी अशोक आसावा, ईलियास शेख, पत्रकार संजय कोळसे, शाम गोसावी, राजेंद्र बर्डे, प्रा. नवनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी मानले.

याप्रसंगी  कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, भगवतीपूरचे उपसरपंच प्रकाश खर्डे, दिलीप बोरुडे, गोरख खर्डे, सहायक फौजदार बाबासाहेब लबडे, विखे कारखान्याचे संचालक धनंजय दळे, स्वप्निल निबे, पंढरीनाथ खर्डे, ऋषिकेश खांदे, श्रीकांत खर्डे, श्रीकांत बेद्रे, सुनील शिंदे, दीपक देडगावकर, शिवकुमार जंगम, बब्बाभाई शेख, आसिफ शेख, आसीर पठाण, धनंजय लोखंडे आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!