बेलापुर ( जनता आवाज वृत्तसेवा):- बेलापूर येथुन जवळच असलेल्या वळदगाव येथील शेटे वस्ती भागात बिबट्याने उच्छाद मांडला असुन दोन दिवसात भर दिवसा चार शेळ्यांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन वन विभागाने तातडीने पिंजरा लाऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वळदगाव सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब शेटे पाटील यांनी केली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासुन वळदगाव- उंबरगाव शिवेवर असलेल्या माजी सरपंच बाबासाहेब शेटे पाटील यांच्या वस्ती परिसरात दोन बिबटे दडून बसले असुन ते दिवसाही अनेकांना दर्शन देत आहेत. त्यामुळे शेतात काम करणारे मजूर व वस्ती परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वस्तीच्या पूर्वेला काही अंतरावर जागृत श्री. काळभैरवनाथ मंदिरात नित्याने भाविकांची वर्दळ असते. याशिवाय शाळा, महाविद्यालयासह परिसरातील नागरिक बाजूच्या रस्त्याने दैनंदिन कामांसाठी ये – जा करीत असतात.
बिबट्याने भर दिवसा चार – पाच शेळ्यांचा फडशा पाडला आहे. ही बाब लक्षात घेता संभाव्य मानवी हानी रोखण्यासाठी वन विभागाने तातडीने पिंजरा लाऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्वश्री बाबासाहेब शेटे, अशोक भोसले,अँड.मधुकर भोसले, अशोक भांड, रमेश भोसले, पोपट भोसले प्रतापराव शेटे, सुदाम शेटे, यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.