spot_img
spot_img

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘तेलंगणा मॉडेल’ ची आवश्यकता’अबकी बार किसान सरकार’ घोषणा प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार: माजी आ. भानुदास मुरकुटे

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- तेलंगणा राज्यातील कालेश्वरम या जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन योजनेसह अन्य विकास कामे व विविध योजनांची प्रत्यक्ष पाहणीनंतर आपण भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. राज्याचा सर्वांगीण विकासासाठी ‘तेलंगणा मॉडेल’ची गरज आहे. पक्षाचे प्रमुख तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्यावर विश्वास दर्शवित आपली पक्षाच्या राज्य कार्यकारी समिती सदस्य म्हणून नियुक्त केली असून राज्याची जबाबदारी सोपविली आहे. भविष्यात श्रीरामपूर विधानसभा मतदार संघासह जिल्ह्यात व राज्यात पक्ष बांधणीसाठी काम करणार असून राज्यात ‘अबकी बार किसान सरकार’ आणण्याचा निर्धार असल्याचे प्रतिपादन भारत राष्ट्र समिती पक्षाचे राज्य कार्यकारी सदस्य माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.                          
 माजी आ.मुरकुटे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केल्यानंतर श्रीरामपूर येथे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी पक्षाच्या किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम होते, तर मेळाव्यास पक्षाचे कार्यकारी समिती सदस्य माजी आ.अण्णासाहेब माने, श्री.घनःशाम शेलार, कदिर मौलाना यांचेसह श्री.रंधवा, औरंगाबाद जिल्हा समन्वयक रमेश रेठे, शहर समन्वयक मतिन शेख, अशोक धातोडकर, औरंगाबादच्या समन्वयक सौ.सुनिताताई सोनटक्के यांचेसह कोंडीराम उंडे, ज्ञानदेव साळुंके, सुरेश गलांडे, हिम्मतराव धुमाळ, बाबासाहेब काळे, अ‍ॅड्.सुभाष चौधरी, काशिनाथ गोराणे, बाबासाहेब ढोकचौळे, पुंजाहरी शिंदे, भागवतराव पवार, सिद्धार्थ मुरकुटे, सौ.मंजुश्रीताई मुरकुटे,सौ.सुनीताताई गायकवाड, सौ.मीराताई बडाख, सौ.शीतलताई गवारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.           
 मेळाव्याला संबोधित करताना माजी आ.मुरकुटे म्हणाले की, अवघ्या नऊ वर्षात तेलंगणा राज्याची मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी केलेली विकास कामे,विविध योजना व प्रगती बघून आपण भारावून गेलो.महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता असून राज्यकर्ते राजकीय उखाळ्यापाखाळ्यात अडकले आहेत. अशावेळी राज्याला भारत राष्ट्र समितीसह के. चंद्रशेखर राव यांच्यासारख्या दूरदर्शी नेतृत्वाची गरज आहे. राज्यात जनतेने पक्षाकडे सत्ता दिली तर तेलंगणाच्या धर्तीवर योजना राबवून राज्याचा सर्वांगीण विकास होईल. शेती समृध्द होवून शेतक-यांचे आर्थिक परिवर्तन होईल. समाजातील सर्व घटकांचे जीवनमान बदलेल. हा बदल हवा असेल आणि राज्यात परिवर्तन घडवायचे असेल तर राजकीय परिवर्तन करावे लागेल. भारत राष्ट्र समिती राज्यातील ४८ लोकसभा व २८८ विधानसभा जागा लढविणार आहे. राज्याच्या विकासासाठी ‘अबकी बार किसान सरकार हि घोषणा’ प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्धार असल्याचे ते म्हणाले.               
तेलंगणा राज्यातील योजनांचा तपशील सांगताना श्री.मुरकुटे म्हणाले की, गोदावरी नदीवर १५० कि.मी.आंतरामध्ये बॕराकेटिंग पध्दतीने पाणी अडवून ६०० टि.एम.सी पाणी उपलब्ध केले आहे. सदरचे पाणी ६१८ मिटर उंचावर उपसा सिंचन योजनेव्दारा उचलून तळ्यात साठवून राज्यभर सिंचनासाठी उपलब्ध केले आहे. नद्यांच्याखाली बोगदे करुन हे पाणी आवश्यक ठिकाणी उपलब्ध केले जाते. यासाठी ८४ हजार कोटी खर्च करण्यात आला. ६ हजार क्युसेक्स वहन क्षमतेच्या कालवे व २ लाख क्षमतेपर्यन्तच्या विद्युत मोटारीव्दारे पाणी उपसा करुन राज्यभर पाणी फिरविले. यामुळे तेलंगणा राज्यात ८०% सिंचन झाले आहे. अशा त-हेची हि जगातील सर्वात मोठी व अवाढव्य अशी उपसा सिंचन योजना आहे.
अशा त-हेची हि जगातील सर्वात मोठी व अवाढव्य अशी उपसा सिंचन योजना आहे. या योजनेमुळे जिरायत तेलंगाणा आज हिरवागार झाला आहे. शेतक-यांना पेरणीपूर्व एकरी १० हजाराचे विनापरताव्याचे अर्थसहाय्य केले जाते. शेतीला चोवीस तास मोफत वीज व पाणी पुरविले जाते. जुन्या तलावांचे नुतनीकरण करण्यात आले आहे. भविष्यात गोदावरी-कृष्णा नदीचे १ हजार टी.एम.सी.पाणी उपलब्ध करुन शेती समृध्द केली जाणार आहे. कोणीही व्यक्ती मयत झाली तर वारसांना ताबडतोब ५ लाखाचे अर्थसहाय्य दिले जाते. शेतमालाला शाश्वत भाव, राज्यातील १२ हजार गावांना प्रतिदिन १०० लिटर प्रमाणे शुध्द फिल्टर्ड पिण्याचे पाणी पुरविले जाते. गर्भावती महिलांना मोफत वैद्यकीय उपचार, सकस पोषण आहार व मुलच्या जन्मानंतर १३ हजार तर मुलीच्या जन्मानंतर १४ हजार अर्थसहाय्य दिले जाते. मागासवर्गियांना धंद्यासाठी १० लाखाची मदत केली जाते.
महाविद्यालयिन स्तरापर्यन्त शिक्षण मोफत आहे. परदेशी शिक्षणासाठी १० लाखाची शिष्यवृत्ती दिले जाते. प्रत्येक गावात दवाखाने असून मोफत वैद्यकीय उपचार केले जातात. अशाच योजनांची महाराष्ट्राला गरज असल्याचे श्री.मुरकुटे म्हणाले.
         
अध्यक्षीय भाषणात श्री.माणिकराव कदम म्हणाले की, शेतकर्‍यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा व राज्याचा विकास होणार नाही. शेती परवडत नाही म्हणून शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतात. विदर्भ, मराठवाडा भागातील शेती पाण्याअभावी जिरायत राहिली. यामुळे या भागाचा विकास झाला नाही. तेलंगणा राज्याने विविध योजना राबवून शेतीचा विकास व त्या माध्यमातून राज्याचा विकास साधला आहे. राज्यातील शेती व शेतकर्‍यांची स्थिती बदलायची असेल तर तेलंगणा राज्याच्या धोरणांचा अवलंब करावा लागेल. तसेच राज्यात राजकीय बदल घडवावा लागेल. तशी मानसिक तयारी जनतेने ठेवण्याचे आवाहन श्री.कदम यांनी केले.
             
राज्य कार्यकारी समिती सदस्य घन:शाम शेलार म्हणाले की, आम्ही राजकीय अडचण म्हणून पक्ष बदललेला नाही तर तेलंगणा राज्याची सर्वांगीण प्रगती पाहून निर्णय घेतला. देशाला तेलंगणा राज्यासारख्या धोरणांची गरज आहे. एखाद्या राज्याची इतक्या गतीने प्रगती होते यावर विश्वास बसत नाही. के. चंद्रशेखर राव यांनी राज्य बदलले, त्यांच्यात देश बदलण्याची क्षमता आहे. शेतकर्‍यांचे स्वप्न साकार करावयाचे असेल तर शेतमालाला शाश्वत भाव मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्यात राजकीय परिवर्तनाचा निर्धार असल्याचे श्री.शेलार म्हणाले. यावेळी बोलतांना माजी आ.अण्णासाहेब माने म्हणाले की, महाराष्ट्र हे नैसर्गिक साधनसंपत्तीबाबत समृद्ध असून केवळ राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे प्रगती खुंटली आहे. राज्यात तुकडे तुकडे सरकार असून विकास कामापेक्षा राजकीय उचापती सुरु आहेत. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाचा थक्क करणारा विकास साधला आहे. हैदराबाद येथे सर्वात मोठे आय.टी. हब निर्माण करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत, असे ते म्हणाले. श्री.कदीर मौलाना म्हणाले की, राज्यातील सामाजिक अवस्था चिंताजनक आहे. जो देश व राज्य सांभाळतो त्याची नियत साफ असली पाहिजे. आपल्या प्रजेची काळजी घेणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असते. केवळ नऊ वर्षात जिरायत तेलंगणा बागायत झाले, ही किमया तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी करुन दाखविली. तेलंगणा सरकार गर्भवती महिलांबाबत आई बापाची भूमिका पार पाडते. तसेच राज्यातील सर्व घटकांची काळजी घेते हे ध्यानात घेता महाराष्ट्रातही भारत राष्ट्र समिती पक्षाची गरज असल्याचे श्री.मौलाना म्हणाले.
             
 यावेळी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, सौ.सुनिताताई गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश छल्लारे यांनी केले. श्री.हिम्मतराव धुमाळ यांनी मांडलेल्या अध्यक्षीय सूचनेस श्री.नाना पाटील यांनी अनुमोदन दिले. श्री.मयुर पटारे यांनी सूत्रसंचालन केले. तर अ‍ॅड्.सुभाष चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. मेळाव्यास श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला, युवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   
तालुकाध्यक्षपदी सुरेश गलांडे –
 श्री.माणिकराव कदम यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्तीची घोषणा केली. यात श्री.सुरेश गलांडे (तालुकाध्यक्ष), मयुर पटारे (उत्तर नगर जिल्हा समन्वयक), शरद पवार (दक्षिण नगर जिल्हा समन्वयक) याप्रमाणे नियुक्तीची करण्यात आली. श्री.कदिर मौलाना यांनी आपल्या भाषणात श्री.मुरकुटे यांचा ऐंशी वर्षाचा तरुण योद्धा असा उल्लेख केला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!